औरंगाबाद - जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना कृतीशील न्याय देण्याच्या व्यापक भुमिकेतून स्थापन करण्यात आलेल्या रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदावर सिद्धार्थ मोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक पदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केेले आहे.
सिद्धार्थ मोकळे हे गेली 10-12 वर्ष पुरोगामी चळवळीत कार्यरत असून विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर लढा देत आले आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र असून महिला बचतगट चळवळीत त्यांचे भरीव योगदान आहे. मुंबईतील साडे सहा हजार औषध विक्रेत्यांकडून लाखो रुग्नांची होणारी लुट रोखण्यासाठी मोकळे यांनी आत्मभान संघटनेच्या माध्यमातून यशस्वी लढा दिला होता.
अलिकडच्या काळात वाढलेले अन्याय-अत्याचार आणि संपूर्ण बहुजन समाजासमोर उभे राहत असलेले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय प्रश्न तसेच जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांकडे रिपब्लिकन जनशक्ती गांभीर्याने लक्ष देणार आहे.
प्रसिद्ध साहित्यिक आणि पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. रिपब्लिकन जनशक्ती हा कुठलाही गट नसून एक स्वतंत्र राजकीय पक्ष असल्याचे मोकळे यांनी सांगितले,
कामगारांचं शोषण, जातिय अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्ज, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, सरकारी कामातील भ्रष्टाचार, वीज-पाणी-रस्ते या मूलभूत नागरी सुविधांची वानवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनागोंदी, खासगी हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांकडून होत असलेली लूट, पुरोगामी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांवरील हल्ले हे रिपब्लिकन जनशक्ती समोरील प्रमुख विषय आहेत.