औरंगाबाद- पाच वर्षांपूर्वी रिमझिम पावसामुळे पिंर्जयाची भिंत कोसळली आणि वाघीण आपसूकच बाहेर आली. सुदैवाने ती संग्रहालयाबाहेर पडली नाही, अन्यथा शहरात हाहाकार माजला असता. या घटनेनंतर शहाणी होईल ती महानगरपालिका कसली.
आजघडीला तीन बछड्यांना जन्म देणार्या वाघिणीच्या पिंर्जयाची अवस्था तशीच आहे. सर्व बाजूंनी जाळ्या तुटल्या आहेत. वाघीण बंदिस्त वाटावी असे चित्र नाही. त्यामुळे 2009 च्या घटनेची पुनरावृत्ती कोणत्याही क्षणी होऊ शकत असली तरी प्रशासकीय पातळीवर मात्र फाइल या टेबलावरून त्या टेबलावर ढकलण्याचे काम इमानेइतबारे सुरू आहे.
वाघिणीच्या पिंर्जयाच्या भिंतीवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. भिंतीवर वाघीण उडी मारू शकत नाही, असा समज करून त्यांच्या दुरुस्तीकडे डोळेझाक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात 5 ते 8 फूट उंचीची भिंत पार करणे वाघिणीसाठी मोठी गोष्ट नाही. तरीही तुटलेल्या जाळ्यांच्या भरवशावर तिला पिंज-यातील मोकळ्या जागेत सोडण्यात येते. हिंस्र प्राण्याच्या बाबतीत असा धोका पत्करणे योग्य नाही, याची जाणीव सर्वांना असली तरी त्याकडे कोणी लक्ष देण्यास राजी नाही.
प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांच्या मते जाळ्यांची डागडुजी अनिवार्य असल्यामुळे शहर अभियंता विभागाला याची कल्पना देण्यात आली. त्यानुसार अंदाजपत्रकही तयार झाले. त्याला मंजुरीही मिळाली. पण प्रत्यक्षात अजून काम सुरू झालेले नाही. अंदाजपत्रकही तयार झाले असून लवकरच 15 लाखांचे काम येथे सुरू होऊ शकेल, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल आणि वाघीण पिंजर्यताून बाहेर पडण्याची शक्यता कधी कमी होईल, याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही.
2009 मध्ये काय झाले होते?
पावसाची झड लागलेली. भल्या पहाटे नाल्याच्या बाजूने असलेल्या पिंर्जयाची भिंत कोसळली. वाघिणीला याची कल्पना नसावी. ती अलगद बाहेर आली. मात्र, तिला पिंर्जयाबाहेरचा परिसर अपरिचित होता. त्यामुळे ती नाल्याच्या बाजूने पुढे संचालकांच्या कार्यालयाच्या बाजूने पुढे कोपर्यात गेली. दरम्यान, हा प्रकार कर्मचार्याच्या लक्षात आला. घाबरलेल्या कर्मचार्याने सर्वांना याची माहिती दिली. पोलिस, अग्निशमन यंत्रणा दाखल होईपर्यंत ती वाघीण तेथेच थांबली होती. मार्ग बदलून ती उद्यानाबाहेर आली असती तर शहरात हाहाकार माजला असता. मात्र ती उद्यानात थांबली आणि साडेदहा वाजता तिला पुन्हा जेरबंद करण्यात आले. तेव्हा भिंत पडली होती, या वेळी जाळ्या नादुरुस्त आहेत.