आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भूमिगत’चे दुष्परिणाम; नूर कॉलनीतील वाहिनी काढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूर कॉलनी येथील अनेक घरांत नाल्याचे पाणी शिरले आहे. - Divya Marathi
नूर कॉलनी येथील अनेक घरांत नाल्याचे पाणी शिरले आहे.
औरंगाबाद: पावसाचे पाणी कोणत्याही अडथळ्याविना वाहून जात असल्याचे चित्र गतवर्षीपर्यंत नूर कॉलनी येथे दरवर्षी दिसत होते. यंदा मात्र पहिल्याच पावसात थेट घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्याचे कारण म्हणजे भूमिगत गटार योजनेतून येथे टाकण्यात आलेली १२०० मिमी व्यासाची वाहिनी. या वाहिनीमुळे खरे तर पाणी सुरळीत वाहून जायला हवे होते. परंतु चढ अन् उतार याचा विचार करता वाहिन्या टाकण्यात आल्या. 
 
नागरिकांनी तक्रार केली. पालिकेच्या दक्षता पथकाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही वाहिनीच काढून टाकावी, असे आदेश दिले. अनेक ठिकाणी वाहिन्या टाकल्यानंतरच नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे असे प्रकार अनेक ठिकाणी झाले असण्याची शक्यता आहे. नूर कॉलनी येथील हा प्रकार म्हणजे ‘भूमिगत’मध्ये झालेल्या गैरकारभारातील हिमनग असल्याचे या योजनेच्या कामाबाबत सर्वप्रथम तक्रार करणारे माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी म्हटले आहे. 
 
ठेकेदाराने नाल्यांतील माती काढल्याने घरांमध्ये पाणी शिरू शकते, अशी भीती शहरातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मात्र तरीही ठेकेदाराने उपाययोजना केल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून यात राजकीय पक्षांनीही उडी घेतली आहे. अनेकांनी आयुक्तांकडेही तक्रार केली. सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
 
नूर कॉलनीतील हे उदाहरण म्हणजे येत्या काळात पुढे काय पेरून ठेवले आहे, याचे संकेत आहे. नाल्यात वाहिन्या टाकताना ठेकेदाराने चढ कोणत्या बाजूने आहे, उतार कोठे आहे याचा विचार केला नाही. दिसली जागा की टाक वाहिनी असे प्रकार चालवले. नूर कॉलनी येथेही असेच झाले. त्यामुळे पहिल्याच पावसात नाल्यातून पाणी वाहून जाऊ शकले नाही आणि ते नागरिकांच्या घरात शिरले.
 
भूमिगतच्या कामामुळेच हा प्रकार झाल्याची नागरिकांची तक्रार होती. आयुक्त दीपक मुगळीकर यांनी या जागेची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दक्षता पथकाला दिले होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपला अहवाल सादर केला. त्यानुसार ही वाहिनी चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आली असून भविष्यात ती धोकादायक ठरणार आहे. 
 
त्यामुळे ही वाहिनीच काढून टाकण्यात यावी, असे सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी ही वाहिनी काढून टाकण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी तसे लेखी आदेश जारी केले. त्यानुसार ही वाहिनी आता काढली जाणार आहे. 
 
 
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम 
या योजनेत शहरात सर्वत्र असेच काम झाले आहे. नूर कॉलनीतील प्रकार म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अजून पुरेसा पाऊस झाला नाही. जेव्हा जोरदार पाऊस होईल तेव्हा एकेक प्रकार समोर येईल. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, असे मी वर्षभरापूर्वीच म्हटले होते. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले की असेच होते. -समीर राजूरकर, माजी नगरसेवक 
बातम्या आणखी आहेत...