आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अट्टाहास: भल्या पहाटे सिद्धार्थ उद्यानात गरमागरमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: सिद्धार्थ उद्यानातील रम्य वातावरणात भ्रमंतीसाठी जाणार्‍या औरंगाबादकरांनी भल्या पहाटे तेथे जोरदार शाब्दिक चकमक अनुभवली. मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या जागेवरून सिद्धार्थ उद्यान बचाव कृती समिती आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे संग्रहालय हिरवळीवर होऊ देणार नाही यावर कृती समिती आडून बसली होती, तर संग्रहालय नियोजित जागेवरच होणार यावर खैरे ठाम होते. दोन्ही बाजूंकडून आवाज वाढल्याने उद्यानाची शांतता मात्र भंगली.
प्रत्यक्ष बांधकाम सुरू होताच सिद्धार्थ उद्यानात दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी उद्यान बचाव कृती समिती स्थापन करून विरोध केला आहे. यासाठी त्यांनी महापौर, आयुक्तांपासून थेट पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. खासदार खैरे यांची भेट घेण्याची त्यांची मागणी होती. या मागणीला मान देत खासदार खैरे सकाळी साडेसहा वाजता उद्यानात पोहोचले.
त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, स्थायी समितीचे सभापती विकास जैन, सभागृहनेते राजू वैद्य, युतीचे गटनेते गिरजाराम हाळनोर, माजी उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी आदी होते.
पर्यावरणवादी प्रा. विजय दिवाण यांनी झाडांची कत्तल करून झालेले कोणतेही बांधकाम आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत हिरवळीवर बांधकाम होऊ दिले जाणार नाही, अशी कृती समितीची भूमिका होती, तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्याने संग्रहालय तेथेच होणार, यावर खैरे ठाम होते. त्यातच पुतळ्याच्या बाजूला 100 मीटरपर्यंत बांधकाम होऊ दिले जाणार नाही, असा इशारा डी. बी. खिल्लारे यांनी दिला.
संघर्ष समितीच्या सदस्यांमध्येही एकवाक्यता नव्हती. त्यामुळे प्रकरण हमरी-तुमरीवर आले आणि संग्रहालय नियोजित जागीच होणार, असे स्पष्ट करत खैरे तेथून निघून गेले.