आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडाच्या धर्तीवर ‘सिद्धार्थ प्राणीसंग्रहालय’चा होणार विस्तार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक प्राणिसंग्रहालयांच्या धर्तीवर सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. सध्या 14 एकरांवर असलेल्या प्राणिसंग्रहालयाचा आता आणखी 20 एकरांत विस्तार करण्याची मान्यता झू एक्स्पर्ट कमिटीने 28 मे रोजी दिली आहे. तसा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संग्रहालयातील प्राण्यांचा जीव माणसांच्या गर्दीमुळे गुदमरणार नाही. त्यांना मोकळा श्वास घेता येईल आणि पर्यटकांनाही मनसोक्त फिरण्याचा आनंद मिळेल.

जागा अपुरी असल्याने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. त्यांची घुसमट होत आहे. अपुर्‍या जागेतच प्राण्यांचे पिंजरेही लावलेले आहेत. त्यामुळे येथे मोकळ्या वातावरणाचा अभाव आहे. सिंह, वाघ आणि चित्ता यांच्या पिंर्ज‍यासमोरच हरिण, नीलगाय, माकडांचा पिंजरा उभारण्यात आला आहे. जेव्हा सिंह, वाघ, बिबट्या पिंजर्‍यता वावरतो तेव्हा हरिण, नीलगाय भीतीने कोपर्‍यात दडून राहतात. घुबडाच्या पिंजर्‍यता माकडाला ठेवले होते. पिंर्ज‍याच्या पाठीमागील भाग अस्वच्छ आहे. पूर्वेकडून दक्षिणेकडे वाहणारा मुख्य नाला आणि पश्चिमेस खाम नदीत घाण साचल्याने प्राणिसंग्रहालयात प्राण्यांचा जीव गुदमरत आहे. यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परिणामी प्राण्यांचा शारीरिक विकास खुंटत असल्याचा निष्कर्ष केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या समितीने काढला होता. डॉ. ए. के. मल्होत्रा आणि ए. एस. डोग्रा यांनी 11 जानेवारी रोजी पाहणी करून मनपा प्रशासनास तातडीने प्राणिसंग्रहालयात नैसर्गिक वातावरण तयार करण्याचे आदेश दिले होते. मास्टरप्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या आणि मार्गदर्शक तत्त्वेही दिली होती. केंद्रीय प्राधिकरणाचे सचिव बी.एस.बोनल यांनी या प्लॅनमधील त्रुटी दूर करून सुधारित प्लॅन मंजूर केला आहे.

2007 पासून प्रयत्न
प्राणिसंग्रहालय बाहेरील प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी 2007 मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला. ‘झू’चे सल्लागार डॉ. गुलाबराव खेडकर यांनी प्राणिसंग्रहालयाचा मास्टरप्लॅन तयार केला. त्यांनी ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कॅनडा येथील प्राणिसंग्रहालयांना भेट दिली. तेथील नवीन संकल्पना त्यांनी इकडे आणली. पर्यटकांना काचेच्या केबिनमधून प्राणी पाहता येतील. मराठवाड्यातील एकमेव आदर्श ‘झू’चा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली.


एसटीपी, ईटीपीचा मार्ग मोकळा
तातडीने मलनि:सारण प्रकल्प उभारण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने मनपा प्रशासनास दिल्या आहेत. त्या दृष्टीने मनपाने पाऊल उचलले असून एसटीपी व ईटीपी प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे. महिनाभरात त्या कामास सुरुवात होईल.


उद्यानातील प्राणिसंख्या अशी
सिंह 1, पांढरे वाघ 4, पट्टेदार वाघ 5, बिबटे 2, अस्वल 2, हत्ती 2, नीलगाय 11, सांबर 34, काळवीट 43, तडस 3, लांडगा 1, चितळ 2, माकड 3, 80 ते 90 साप, कासव 48, पक्षी 28, इमू 2, मगर 3, उदमांजर 5, सायळ 4, पांढरा आणि रंगीत मोर प्रत्येकी एक असे सर्व मिळून 289 प्राणी आहेत.


तीन महिन्यांत काम सुरू करणार
मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्रुटी दूर करण्यात आल्या. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून दोन ते तीन महिन्यांत प्राणिसंग्रहालयाच्या सर्वांगीण विकास कामास प्रारंभ करण्यात येईल. एसटीपी आणि ईटीपी प्रकल्प लवकरच बसवण्यात येणार आहे. डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा.


विस्ताराचे फायदे असे
0पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल
0 निसर्गरम्य वातावरणात प्राण्यांचे जवळून निरीक्षण
0 प्राणी-पक्ष्यांचे आरोग्य सुधारणार
0 एसटीपी आणि ईटीपी प्रकल्प लवकर सुरू होणार
0 पाण्याचे शुद्धीकरण करून उद्यानासाठी वापरता येईल