आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sieve The Road District Department Of Public Works Ignored Repair Of Road

औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यांची चाळणी; दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्लेगाव- गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव ते मालुंजा या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तीन वर्षांमध्ये या मार्गावर छोटे-मोठे अपघात झाले आहेत. विविध अपघातांमध्ये आतापर्यंत आठ ते दहा लोकांना आपले प्राणदेखील गमावावे लागले आहेत. या मार्गाची एवढी गंभीर परिस्थिती असताना याकडे यासार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा संतप्त सवाल वाहनधारकांसह नागरिकांमधून केला जात आहे.


माळीवाडगाव, वैरागड, लासूर स्टेशन, शिरेगाव, शिल्लेगाव, बुट्टेवाडगाव, शेकटा, सिद्धनाथ वाडगाव, तांदुळवाडी, मालुंजा या 30 कि.मी. रस्त्याची ठिकठिकाणी चाळणी झाली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांसह वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. या मार्गावरून कापूस, मका, ऊस, कांदा आदी शेतीमालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अगोदरच हा रस्ता अरुंद पडत आहे. त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.


पावसाळा संपून तीन महिने उलटले तरीही अद्याप या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह प्रवाशांना मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजर उद्भवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांमधून होत आहे.


गोळेगाव-खंडाळा रस्त्याची दुरवस्था
खडी, क्रशर बंद असल्याने डागडुजीचे काम बंद
तीन महिन्यांपासून खडी, क्रशर बंद असल्याने रस्त्याच्या डागडुजीचे काम बंद आहे. 15 दिवसांत काम सुरू होण्याची शक्यता आहे. - एस. बी. काबरे, सा. बां. विभाग, गंगापूर
गोळेगाव । सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव - खंडाळा रस्त्याचे एक किलोमीटरचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्याचबरोबर येथे जागोजागी खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना देण्यात आला आहे.


सिल्लोड-सावखेडा रस्ता उखडला
सिल्लोड २ सावखेडा या 20 किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा उपतालुकाप्रमुख दत्ता चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत सिल्लोडच्या विभागीय अधिकारी व सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. सिल्लोड - सावखेडा या राज्यमार्ग क्रमांक 183 या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. केवळ 20 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल दीड तास लागतो. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता सिल्लोड-कन्नड महामार्गावरील बोरगाव बाजार फाट्यावर दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरदारसिंग लकवाल, रामदास राऊत, नंदकुमार जैन, शांताराम साखरे, हारुण पठाण, तेजराव साखरे, दगडू चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.