आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकत जळगावचे 26 रेशीम शेतकरी बनले लक्षाधीश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील 92 शेतकर्‍यांच्या शेतात सात-आठ वर्षांपूर्वी जेमतेम शेतीमालाचे उत्पादन होत असे. प्रत्येकी दीड-दोन एकर जमिनीत पारंपरिक पिके घेऊन ते घायकुतीस आले होते. आता मात्र त्यांना चांगले दिवस आले आहेत. हे 92 शेतकरी 210 एकरांवर रेशीम शेती करतात. कर्नाटकच्या जागतिक बाजारात सामूहिकपणे रेशीम विकतात. खर्च वजा जाता एकरी सरासरी दीड लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. 26 शेतकर्‍यांना आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हे शेतकरी आता लक्षाधीश बनले आहेत.

कमी खर्चात राज्यात सर्वाधिक रेशीम कोष उत्पादन करणारे गाव अशी नवी ओळख केकत जळगावने निर्माण केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत तुतीची लागवड करण्यात येते. लागवडीपासून तीन महिन्यांत रेशीम कोष उत्पादनास सुरुवात होते. सुरुवातीची एक-दोन वर्षे उत्पन्न कमी मिळते. मात्र, नंतर उत्पादनात वाढ होत जाते. बाजारात रेशीम कोषाला 36 ते 40 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

एकाच गावात 210 एकरांत लागवड
राज्यात एकाच गावात 210 एकर रेशीम शेती कोठेच केली जात नाही, पण केकत जळगाव याला अपवाद आहे. गतवर्षीपर्यंत केवळ 43 एकरांवर रेशीम शेती केली जात होती. मात्र, कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने यंदा 165 एकरांनी वाढ झाली आहे. त्यांना एकरी सरासरी दीड लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. 26 शेतकर्‍यांना तर आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. एकरी 500 किलो रेशीम कोष मिळतो. मराठवाड्यात 250 मेट्रिक टन कोष : मराठवाड्यातील 1303 शेतकरी 1753 एकरांवर रेशीम (तुतीची) शेती करतात. त्यापासून दरवर्षी 200 ते 250 मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन होते. जिल्हा रेशीम विभाग 17 हजार 800 रुपये क्विंटल या शासकीय हमी भावाप्रमाणे कोष खरेदी करतात. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेशीम कोषाला 3600 ते 50 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे 90 टक्के शेतकरी रामनगरमच्या बाजारपेठेत विक्री करत आहेत.

रेशीम शेती देत आहे 7 हजार रोजगार
तुती लागवडीसाठी एकरी 6 हजार 750 रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकर्‍यांसाठी 7 लाख 76 हजार 250 रुपये मंजूर झाले आहेत. त्याचे वाटपही जानेवारीअखेर होणार आहे. यापासून 7 हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळाला असून एकाच गावचे 26 शेतकरी लक्षाधीश झाले आहेत. राज्यात 210 एकरांवर रेशीम शेती करणारे एकमेव गाव असल्याचे प्रभारी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी सांगितले.

मिळणारे अर्थसाहाय्य असे
कीटक संगोपन गृहासाठी व रेशीम शेतीला चालना देण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळ व राज्य शासनाच्या वतीने एक कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 52, जालना 40 आणि बीड जिल्ह्यात 8 अशी 100 कीटक संगोपन गृहे उभारण्यात आली आहेत. त्यांना हे अनुदान 1 फेब्रुवारीपासून वाटप करण्यात येणार आहे. यामुळे कोष उत्पादनाला चालना मिळत आहे.

जागतिक बाजारपेठेत नफा
मराठवाड्यात वर्षभरात दोनशे मेट्रिक टनांपेक्षा अधिक उत्पादन होते. शासकीय भावापेक्षा आशिया खंडातील एकमेव रेशीम बाजारपेठ असलेल्या कर्नाटकातील रामनगरम येथे 90 टक्के शेतकरी कोषांची विक्री करतात. या बाजारपेठेत क्विंटलमागे 40-50 हजार रुपये भाव मिळतो. त्यामुळे क्विंटलमागे 23 हजार रुपये फायदा शेतकर्‍यांना होतो. दिलीप हाके , प्रादेशिक रेशीम संचालक, औरंगाबाद

आम्ही पारंपरिक कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिके घेत होतो. त्यामुळे शेती तोट्यात आली. पण जेव्हापासून रेशीम शेती करू लागलो तेव्हापासून लखपती होण्याचा मान मिळाला. सध्या माझ्याकडे साडेसहा एकर तुतीची लागवड केली आहे. यापासून मला वर्षभरात आठ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. आमच्या गावात 210 एकर शेतीमध्ये 92 शेतकरी रेशीम शेती करतात. आम्ही समूहाने रेशीम कोष कर्नाटकातील रामनगरम या जागतिक बाजारपेठेत विकतो. एकरी सरासरी दीड लाखाचे निव्वळ उत्पन्न मिळते. आतापर्यंत 26 शेतकरी लक्षाधीश झाले आहेत. संतोष वाघमारे, केकत जळगाव (पैठण)