आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात होणार रेशीम उद्योग केंद्र, कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांना रेशीम उद्योगाकडे वळवण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील शेतक-यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रेशीम प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सी. जे. हिवरे रेशीम संचालक म्हणून राज्य सरकारकडे सध्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्या मदतीने महिनाभरात हे केंद्र सुरू होणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी जाहीर केले.

विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या सभागृहात मंगळवारी (२४ मार्च) ग्रामीण भागातील १५० शेतक-यांना रेशीम उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. तुतीची लागवड, रेशीम अळ्यांचे संगोपन आणि ककुन निर्मितीच्या माध्यमातून शेतक-यांना नफ्याचे उत्पादन घेण्यासाठी रेशीम संचालनालयाच्या अधिका-यांनी काही टिप्स दिल्या. कुलगुरूंचीही या वेळी उपस्थिती असल्याने त्यांना असे केंद्र विद्यापीठातच सुरू करण्याची कल्पना सुचली. प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. हिवरे यांनी कुलगुरूंना शासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत रेशीम प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले.

रोजगाराच्या संधी उपलब्ध
मराठवाड्याला रेशीम उत्पादनांची सुमारे साडेतीन हजार वर्षांची परंपरा आहे. पैठणदेखील रेशीम उत्पन्नात अग्रेसर होते. कर्जबाजारीपणा, दुष्काळाने शेतकरी कोलमडलेला आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा उद्देश आहे. विद्यापीठ अकृषी असले म्हणून काय झाले? समाजाप्रती उत्तरदायित्व आहे.दीड महिन्यातच केंद्र सुरू करणार.
डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

नवा दृष्टिकोन मिळेल
स्वतंत्र केंद्र केल्यास आपण जबाबदारी घेण्यास तयार आहोत. पुढील एक-दोन महिन्यांत प्रतिनियुक्ती संपत असल्याने मी पुन्हा प्राणिशास्त्र विभागात रुजू होणार आहे. मला रेशीम शेतीचे प्रशिक्षण देण्यात रस आहे. कुलगुरूंनी जबाबदारी दिल्यास मराठवाड्यातील शेतक-यांचे मागासलेपण काही अंशी कमी करण्यासाठी केंद्रामार्फत प्रशिक्षण देता येऊ शकेल.
डॉ. सी. जे. हिवरे, रेशीम संचालक