सिल्लोड - हिंदू देवतेचा अपमान केल्याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदू जागरण मंचच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सिल्लोड बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बंदचे अावाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. भवन येथेही बंद पाळण्यात आला.
दहीगाव (तालुका सिल्लोड) येथील शेतजमिनीच्या वादातून संबंधित शेतकऱ्यास मारहाण करून शिवीगाळ करताना आ.सत्तार हिंदू देवतेचे नाव घेऊन शेतकऱ्यास शिवीगाळ करीत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू जागरण मंचच्या वतीने शनिवारी (१७ जून) सिल्लोड बंदचे अावाहन केले होते. सर्वधर्मीय नागरिक सकाळी आठ वाजता शहरातील हनुमान मंदिराजवळ जमा झाले. हिंदू जागरण मंचचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज मोरेल्लू यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यासाठी फेरीला सुरुवात झाली. हनुमानाची प्रतिमा घेऊन मोरेल्लू फेरीच्या समोर होते. हनुमान मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सराफा मार्केट, शहरातील मुख्य रस्ता, मोंढा या परिसरात फिरून बंदचे अावाहन करण्यात आले.
बंददरम्यान किरकोळ वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलक दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात फिरून बंदचे अावाहन करीत होते. शेवटी तीनच्या सुमारास पोलिसांनी सराफ मार्केट येथून आंदोलकांना अटक केली. आंदाेलनात भाजपचे नेते सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर मोठे, विष्णू काटकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी, माजी चेअरमन श्रीरंग पाटील साळवे, पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर तायडे, माजी सभापती अशोक गरुड, दिलीप दाणेकर, रघुनाथ घरमोडे, संजय डमाळे, विनोद मंडलेचा, कमलेश कटारिया, शेख जाकेर, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे, शिवसेनेचे नगर परिषदेतील गटनेते सुनील मिरकर, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शफिक, युवा व्यापारी संघाचे दुर्गेश जैस्वाल आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अॅट्रॉसिटीचा गैरवापर : आ. सत्तार स्वार्थासाठी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करून दलित संघटनांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे, प्राचार्य सुनील वाकेकर, दादाराव वानखेडे, प्रभाकर पारधे, अरविंद कांबळे, देविदास दांडगे आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.