आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण प्रकरणी आमदार सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल, म्हणाले- शिवीगाळ केल्याबद्दल फाशी द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. तालुक्यातील दहिगाव येथे त्यांच्या शेताला लागून असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या वादात त्यांनी एका शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावर त्यांनी लगेचच खुलासा जारी केला आहे.
 
याप्रकरणी आ. अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह ३२ जणांनी मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दहिगावच्या शेख खलील शेख इब्राहीम, शेख मुख्तार शेख सत्तार व शे.अब्दुल रहीम शेख करीम या शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणी करताना अा. सत्तार, नगराध्यक्ष समीर, आमदारांचे पीए शे.वसीम शे. अजीम, शे. यासेर, शे. नईम आदींनी पेरणीस मज्जाव केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरुन अा. सत्तारांसह ३२ अाराेपींवर गुन्हा दाखल झाला.
 
सत्तार यांनी म्हटले आहे की, ‘मी शेतकऱ्यांना मारहाण केली नाहीच. माझ्या शेताला लागून असलेल्या शेतीवरून दोघांत वाद होते. सोमवारी त्यांच्यात वाद सुरू झाल्याचे मला दिसले. कारण हा वाद माझ्या फार्महाऊसपासून अवघ्या ५० फुटांवर सुरू होता. माझ्या गार्डसह मी तातडीने धावलो. मारहाण करणाऱ्या शेतकऱ्याची सुटका केली. मी मध्ये पडलो नसतो तर दोन गटांत जोरदार हाणामारी होऊन मुडदे पडले असते. मी शिवीगाळ केली एवढीच काय ती माझी चूक. त्याबद्दल मला जाहीर फाशी द्यावी, मी तयार आहे; परंतु मी शेतकऱ्याला मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा आरोप करू नये,’ असे सत्तार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  
 
ज्या जमिनीवरून हा वाद झाला आहे ती न खरेदी करता येणारी जमीन काँग्रेसचे माजी नगरसेवक सखाराम कल्याणकर आणि विठ्ठल सपकाळ यांनी अडीच लाखांत विकत घेतली. साध्या कागदावर हा व्यवहार झाला आहे. तेथे वाद सुरू होताच सत्तारांचा  मुलगा समीर, पीए आणि गार्डसह या वादात पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.     
सोमवारचा हा प्रकार मंगळवारी रात्री सोशल मीडियामार्फत चव्हाट्यावर आला. पोलिस, गार्ड सोबत असताना सत्तार एका शेतकऱ्याला हाकलून लावताना दिसतात.

त्याचबरोबर मोठ्या आवाजात अस्सल ग्रामीण शिव्याही त्यांच्या मुखातून बाहेर पडल्याचे ऐकू येते. देशभर हा प्रकार पोहोचल्यानंतर सत्तार यांनी दहिगाव येथील  एक कुटुंब तसेच शेजारच्या दहा शेतकऱ्यांना घेऊन बुधवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृह गाठले. तेथे माध्यमांशी संवाद साधला. ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली तोच माझ्यासोबत बसला आहे. तेव्हा मी मारहाण केली, असे तुम्ही कसे काय म्हणू शकता, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.  
 
पत्रकारांच्या  प्रश्नावर ‘हे मॅटर तुम्हाला पूर्णपणे समजले नाही. मी समजावून सांगतो,’ असे सांगत सत्तार म्हणाले की, ज्या जमिनीवरून वाद आहे ती महार हडवळा आहे. म्हणजे ती जमीन मी खरेदी करूच शकत नाही. त्यामुळे ती बळकावण्यासाठी मी असे करण्याचा प्रश्नच नाही. २४ वर्षांपूर्वी कल्याणकर कुटुंबाकडून बागवान कुटुंबाने ही जमीन खरेदी केली होती तेव्हा मी मध्यस्थ होतो. परंतु ही जमीन विकता येत नाही असे तेव्हा मला माहिती नव्हते. मात्र दोन कुटुंबांत वाद सुरू झाल्यानंतर मी पुन्हा मध्यस्थी केली. हा वाद समन्वयाने मिटावा यासाठी मी पूर्वीही प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. सोमवारी मी शेतातच होतो. कल्याणकर कुटुंबाकडून बागवान यांच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. त्यांनीच व्हिडिओ क्लिपिंगची व्यवस्था केली होती. त्यात एका शेतकऱ्याला मारताना दिसले, पण तो मी नाही. मी या वेळी शिव्या दिल्या. परिस्थितीच तशी होती. हीच माझी चूक झाली. यात राजकारण असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा हात आहे.” हा दानवे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.  

अशी आहे पार्श्वभूमी     
दहिगावच्या गट क्रमांक ३८ आणि ३९ येथील १० एकर २० गुंठे जमीन भिका राघव साळवे व इतर दोघांना महार हडवळा (वतन) म्हणून मिळालेली होती. मूळ वतन भिका साळवे व दोघांच्या नावे आहे. भिका जाधव यांनी ही जमीन २४ वर्षांपूर्वी आव्हाना येथील शेख भिकू व शेख मन्नू यांना विकली. त्यानंतर भिका याने अलीकडेच ही जमीन काँग्रेसचे माजी नगरसेवक सखाराम कल्याणकर आणि विठ्ठल सपकाळ यांना अडीच लाख रुपये एकराने विकली. मात्र महार हडवळा असल्याने ही जमीन विकता येत नाही. दुसरीकडे याबद्दल कोणताही अधिकृत व्यवहार झाला नव्हता. त्यामुळे शेख भिकू यांनी ताबा सोडला नव्हता. ते सोमवारी पेरणीसाठी गेले होते तेव्हा शेख मुख्तार शेख सत्तार तेथे आले. त्यांनाच मारहाण केल्याचा दावा आमदार सत्तार यांनी केला आहे, तर दुसरीकडे सत्तार यांनीच मारहाण केल्याची तक्रार शेख भिकू यांनी केली आहे. हे प्रकरण वादग्रस्त होते. त्यात आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते असल्याने सत्तार यात पडले. त्यांनी दुसऱ्या गटाच्या शेतकऱ्यांना मारहाण केली, अशी चर्चा आहे. अर्थात, सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत फक्त शिवीगाळ केली. हा गुन्हा ठरल्याचे म्हटले आहे.  

बाजूला माझी १०० एकर जमीन... मी कशाला बळकावू?
सत्तार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून याच गावात माझी ८० ते १०० एकर जमीन आहे. तेथे माझा बंगलाही आहे. येथे एवढी जमीन असताना मी आणखी दुसऱ्याची जमीन कशाला बळकावू, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे ही जमीन महार हडवळा आहे. तेव्हा ती जमीन कोणीच खरेदी करू शकत नाही हे न कळण्याइतका मी लहान आहे का? ज्या दोन कुटुंबांत हा वाद आहे त्यांच्याशी आपले अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. यापुढेही हा वाद मिटवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा दावाही त्यांनी केला.  
 
मी मध्ये पडलो नसतो तर मुडदे पडले असते
घटनेची क्लिप व्हायरल झाल्यानंतर सत्तार यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत खुलासा केला. ते म्हणाले, माझ्या फार्म हाऊसपासून ५० फुटांवर वाद सुरू होता. मध्यस्थी केली नसती तर मुडदे पडले असते; मी मारहाण केली नाही. शिवीगाळ केली एवढीच माझी चूक झाली.     
 
पुढील स्लाइडमध्ये, आमदार सत्तार यांनी शेतकऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...