आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसीय शिबिरातून मिळणार हाताला काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - अत्यल्प अनियमित पावसामुळे यंदा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने शासनस्तरावरून विविध योजना राबवण्यात येत असून लोकसहभागातून जलसिंचनाची कामे हाती घेण्यात येत आहेत. अशाही परिस्थितीत मजुरांकडून कामाची मागणी होत नसल्याने ११ ते १३ एप्रिल असे तीन दिवस ग्रामपंचायत स्तरावर काम मागणी शिबिर आयोजन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, दीड लाख मजुरांना काम देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. त्यापैकी केवळ सहा हजार मजुरांना काम देण्यात आले आहे. टंचाईची परिस्थिती लक्षात घेता मग्रारोहयोअंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ११ ते १३ एप्रिल या कालावधीत शिबिराचे आयोजन करावे. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिबिराचे आयोजन करून शिबिरात उपस्थित राहावे. काम मागणीचे अर्ज पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. व्यापक प्रसिद्धी करून शिबिर यशस्वी करण्याचे आदेश आहेत.

वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य
टंचाईच्या परिस्थितीत तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. सार्वजनिक कामांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सार्वजनिक कामांचा तुटवडा आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एका विभागप्रमुखाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शिबिरादरम्यान किमान पाच ग्रामपंचायतींना भेट देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

चार गावांमध्येच मग्रारोहयाेची कामे
शिवना, अंधारी, घटांब्री रहिमाबाद या चार गावांमध्येच मग्रारोहयोअंतर्गत कामे सुरू आहेत. शिरसाळा शिरसाळा तांडा या दोन गावांत कामाच्या मागणीसाठी २० दिवसांपासून दररोज तीनशेपेक्षा अधिक मजूर जमा होतात, परंतु त्यांच्या हातांना काम मिळत नाही. ऊसतोडीवरून परत आलेल्या मजुरांच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सरपंच गजानन राठोड यांनी सांगितले.