आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड नगरपरिषदेचे कार्यालय पुन्हा जुन्या इमारतीत जाण्याची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - सिल्लोड नगर परिषदेचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतर केल्याने सत्ताधारी नाराज आहेत, तर कार्यालयीन कामासाठी सुसज्ज नवीन इमारत तयार असल्याने स्थलांतर केल्याचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे म्हणणे आहे. त्यांनी संगणक प्रणालीचे उद्घाटन केले. त्यावेळेस नगराध्यक्षा व अन्य पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे अठरा जानेवारीनंतर कार्यालय पुन्हा जुन्या जागेत सुरू होण्याची शक्यता आहे.
सिल्लोड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी गेल्या महिनाभरापासून भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी प्रेरणा देशभ्रतार आहेत. अठरा जानेवारीला त्याची मुदत संपत असून त्या दुस-या पदावर जातील. परंतु या महिनाभराच्या काळात त्यांनी केलेले बदल व घालून दिलेली कार्यपद्धती कायम सुरू राहणार की नियमित मुख्याधिकारी व नगर परिषदेतील सत्ताधारी बदलणार याची चर्चा शहरात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा तेथे सत्तेत असलेल्या सदस्यांच्या बहुमताच्या निर्णयावर चालतो. प्रशासकीय अधिका-यांनाही नियमांच्या अधीन राहुन प्रशासन चालविण्याचे अधिकारही आहेत. सिल्लोड नगर परिषदेवर प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या पूर्वीच्या अधिका-यांनीही बदल केले होते. यात प्रामुख्याने भाप्रसेचे सतीश भिडे यांनी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता रुंद केला. आजही या रस्त्यावर पुन्हा पक्के अतिक्रमण झालेले नाही. याचप्रमाणे प्रेरणा देशभ्रतार यांनीही काही बदल केले परंतु ते प्रशासकीय असल्याने ते पुढील काळात राबविल्याच जातील याबाबत खात्री देता येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सुसज्ज अशी नगर परिषदेची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती.
देशभ्रतार यांनी दहा दिवसांपूर्वी न. प. कार्यालय या इमारतीत सुरू केले. तेथे संगणकीय प्रणाली सुरू केली. या प्रणालीचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश खपले यांच्या हस्ते 13 जानेवारी रोजी करण्यात आले. उद्घाटनास नगराध्यक्षा किंवा अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित नव्हते जन्म-मृत्यू, पाणीपुरवठा, मालमत्ता कर व अन्य महत्त्वाच्या नोंदी संगणाकाद्वारे ठेवण्यास सुरुवात केली आहे. आजही न.प.चे मूळ दप्तर जुन्याच इमारतीत आहे. आवश्यकता भासेल तसे ते आणले जाते. परंतु अठरा जानेवारीनंतर हे कार्यालय पुन्हा जुन्या इमारतीत स्थलांतरित होणार असल्याची शक्यता आहे.
पुन्हा जुन्या जागेवर कार्यालय स्थलांतरित होऊ शकते - न.प. सदस्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला. नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आ.अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होते. मुख्यमंत्री किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या हाताने उद्घाटन झाल्यास त्यांना शहर विकासासाठी निधी मागता येतो. परंतु आधीच कार्यालय हलविण्यात आले. त्यामुळे पुन्हा जुन्या इमारतीत कार्यालय सुरू होऊ शकते. - शंकरराव खांडवे, उपनगराध्यक्ष, नगर परिषद