आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगी, कुटुंब पसंत पडताच दीड तासातच निकाह, शुभ कार्यात उशीर नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - साखरपुड्यासाठी आले अन् लग्न उरकून गेल्याच्या घटना नेहमीच घडतात. पण रोहिलागल्लीतील एक विवाह आगळावेगळा ठरला. येथे साखरपुडा तर सोडाच साधा मुलगा पाहण्याचा कार्यक्रमही झाला नाही. मुलगी बघण्यासाठीच सहा जण शहरात आले. त्यांनी मुलगी बघितली. दोन्ही कुटुंबांचे विचार जुळले आणि दीड तासातच मशिदीत निकाहही पार पडून ‘दिलवाल्यांनी दुल्हनिया’ नेली. कोणतीही देवाणघेवाण नाही, ना पंगत ना मंडप हे या विवाहाचे वैशिष्ट्य ठरले. मुस्लिम समाजात असे निकाह अगदीच दुर्मिळ होतात.
उस्मानाबाद येथे पोलिस दलात नोकरीस असलेले शेख लियाकत यांचा मुलगा शेख मुजाहेद हा एमएसस्सी कॉम्प्युटर शिकलेला. नोकरीच्या शोधात तो दीड महिन्यापूर्वी शहरात आला. रोहिलागल्ली येथील इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये मराठी विभागाचा प्रमुख म्हणून तो नोकरीला लागला. कार्यालयीन सहकाऱ्यांनी त्याला लग्नाविषयी विचारले असता मुजाहेदने ‘यंदा कर्तव्य आहे’, असे सांगताच साथीदाराने त्याला रोशन गेट येथे व्हिडिओ एडिटिंग रेकॉर्डिंग करणारे रऊफ खान यांच्या मुलीचे स्थळ सांगितले.

मुस्लिम समाजात आदर्श
मुजाहेदसारख्या विचारांच्या तरुणांमुळे मुस्लिम समाजातील गरीब आई-वडिलांना मुलींचे लग्न करणे निश्चितच सोपे जाईल. मुजाहेद याने हा आदर्शच घडवल्याची प्रतिक्रिया त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

मुजाहेदने या स्थळाबाबत वडिलांना कळवले. २४ जून रोजी त्याचे वडील दुपारी अडीचच्या सुमारास शहरात हजर झाले. चार ओळखींच्या लोकांसोबत ते रऊफ खान यांच्या घरी गेले. याच वेळी मुलीकडील मंडळीने मुलगा बघितला. दोन्ही कुटुंबीयांत संवाद सुरू झाला. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी पसंत पडली. या शुभ कार्यात उशीर नको, म्हणत दोन्ही कुटुंबीयांनी तत्काळ इस्लाम धर्मानुसार निकाह करण्याचा निर्णय घेतला. वधू हुस्ना खान यांच्या कुटुंबाची निकाहची काहीच तयारी झालेली नव्हती. मात्र मुजाहेद आणि त्याच्या वडिलांनी आत्ताच निकाह करायचा, असा निश्चय केला. त्यांनी कसलीही मागणी नसल्याचेही स्पष्ट करून रोशन गेट येथील महंमदिया मशिदीत अवघ्या दीड तासातच निकाह उरकला.
बातम्या आणखी आहेत...