आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाता गाता अभिनयात कशी आले कळलेच नाही, वाचा केतकी माटेगावकरचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमच्या परिवारात पूर्वीपासूनच गायनकलेचा वारसा आहे. त्यामुळे माझ्या अंगात ही कला अभिजातच आली. मात्र, गाता गाता कधी अभिनेत्री बनले हे मला कळलेच नाही. आता या दोन्ही क्षेत्रांत मी चांगलीच रमले आहे. त्यामुळे गायनासोबतच अभिनयही माझ्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत मराठी चित्रपटांतील
नवोदित, मात्र अवघ्या २०व्या वर्षी आघाडीवर पोहोचलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने.
सुजय डहाके दिग्दर्शित आगामी ‘फुंत्रो’ आणि ‘काकस्पर्श’ चित्रपटाच्या हिंदी व तामीळ रिमेकमध्येही केतकी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याविषयी तिने ‘दिव्य मराठी’शी विशेष बातचीत केली.

‘टाइमपास’ दिशा देणारा
सारेगमप या रिअ‍ॅलिटी शोमधून मी चुणूक दाखवली होती हे खरे. मात्र, एक स्पर्धा आणि वास्तविक कार्य यात खूप फरक असतो. सारेगमपमध्ये मी स्पर्धक म्हणून पुढे आले. मात्र, काकस्पर्श, शाळा, टाइमपास या चित्रपटांमध्ये मला माझे वास्तविक कार्य करायचे होते. हे तिन्ही चित्रपट माझ्या करिअरसाठी प्रेरणादायी ठरले. ‘टाइमपास’च्या प्राजक्ताने मला
घराघरापर्यंत पोहाेचवून दिले. यातील ‘चला हवा येऊ द्या’ हा डायलॉग व्यक्त करण्यासाठी मी माझ्या मूळ स्वभावाच्याही पलीकडे गेले होते आणि याच डायलॉगने करिष्मा केला. मला याचे खूप अप्रूप वाटते.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चे दोन पुरस्कार :
झी मराठी वाहिनीतर्फे आयोजित महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार केतकीला मिळाला आहे. केतकीला ‘टाइमपास’ या चित्रपटातील प्राजक्ता या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर याच चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.

तामिळी शैली अवगत करणे कठीण
काकस्पर्श या चित्रपटाचा हिंदी आणि तामीळ रिमेक पुढच्या वर्षी येणार आहे. या चित्रपटाच्या तामीळ रिमेकमध्ये मी गाणे गायले आहे. हिंदी व मराठीमध्ये मी पूर्वीपासूनच गात आले आहे. मात्र, तामीळ भाषेतील गाण्यांची चाल वेगवान असते. आणि त्या लयीत व शैलीत गाणे माझ्यासाठी अवघड होते. मात्र, मी त्यावर मेहनत घेतली आणि यातील एक गाणे गायलेसुद्धा.