औरंगाबाद- साथरोगांमुळे संपूर्ण शहर त्रस्त झाले आहे. रोगावर नियंत्रण मिळवण्यासोबतच त्याची लागण झालेल्यांना वाचवण्याचे प्रभावी उपाय कोणते याविषयी जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. डेंग्यू शहराला विळखा घालत असताना प्लेटलेट्सची सर्वाधिक गरज भासते. यासाठी सिंगल डोनरच्या माध्यमातून मिळणा-या प्लेटलेट्स सर्वात महत्त्वाच्या ठरतात.
शरीरात दीड लाख प्लेटलेट्स असणे गरजेचे आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होतात. ज्या रुग्णांमध्ये १० हजारांच्या खाली या प्लेटलेट्स जातात, त्यांना बाहेरून प्लेटलेट्स चढवल्या जातात. रक्तातून प्लेटलेट्स वेगळ्या काढून दिल्या जातात. मात्र त्याही पुढे जाऊन सिंगल डोनरच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्लेटलेट्समुळे सहा पट अधिक प्लेटलेट्स शरीरात वाढतात. दत्ताजी भाले रक्तपेढीत रक्तासोबत प्लेटलेट्स देण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकदा रक्तदान केलेल्या व्यक्तीला ३ महिने पुन्हा रक्तदान करता येत नाही. मात्र, प्लेटलेट्स देणाऱ्याला ४८ तासांत पुन्हा प्लेटलेट्स देता येतात. यामध्ये दात्याच्या शरीरातून रक्त काढले जाते, त्यातून प्लेटलेट्स वेगळ्या पिशवीत जमा होतात, आणि रक्त पुन्हा शरीरात टाकले जाते. ३० ते ४० मिनिटे चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी अमेरिका आणि जर्मनीत बनवलेले किट वापरले जातात. यासाठी साधारत: १० हजार रुपये खर्च येतो. मात्र भाले रक्तपेढीमध्ये ८५०० मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
जागरूकतेमुळे तरुण स्वत:हून पुढे येतात
मानवी शरीरात प्लेटलेट्स तयारी होण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. रक्तदान केल्यास ३ महिने
आपण पुन्हा कुणाला मदत करू शकत नाही. मात्र, प्लेटलेट्स दिल्यास आठ दिवसांत पुन्हा कुणालाही मदत करू शकतो. यामुळे अधिक लोकांना आपण मदत करू शकतो. शिवाय प्लेटलेट्स २४ तासांत भरून निघतात. शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. गेल्या वर्षात २५० सिंगल डोनर रक्त लागले होते, पण यंदा मात्र एकच महिन्यात १२५ पिशव्या लागल्या आहेत