आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, शेततळी कागदावर नको; आमच्या शेतातच द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद- उसवलं गणगोत सारं आधार कुणाचा न्हाई, भेगाळल्या भुईपरी जिणं अंगार जिवाला जाळी...बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे, इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे ... करपलं रान देवा जळलं शिवार, तरी न्हाई धीर सांडला... खेळ मांडला...

या"नटरंग' चित्रपटातील गीतांच्या ओळींप्रमाणेच शुक्रवारी बळीराजाची अवस्था दिसून आली. दुष्काळामुळे दारिद्र्याच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहावे, आम्हाला आधार द्यावा, अशी आर्त हाकच दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला देण्यात आली. साहेब, शेतीला पाणी देण्यासाठी आम्हाला शेततळी पाहिजेत; पण ही शेततळी कागदावरच आहेत. कागदावरची शेततळी आमच्या शेतात येऊ द्या, अशी विनवणीही आडूळ, पाचोड आणि एकतुनी गावातील शेतकऱ्यांनी या पथकाकडे केली.

पथकाने शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ, पाचोड आणि एकतुनी या तीन गावांना भेटी दिल्या. पाण्याअभावी शेतकरी आणि शेतीचे झालेले हाल या पथकाने पाहिले. औरंगाबादमधून सकाळी आठ वाजता पथकाने दौऱ्याला सुरुवात केली.

परदेशातआंबे विकले, मात्र आता सारेच जळाले
औरंगाबादजिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी मनोज नरवडे यांनी त्यांच्या आमराईतील केशर आंब्यांची जपानमध्ये विक्री केली. त्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, या सत्काराचा काहीच फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. नरवडे यांची ५० एकर शेती असून शेतात आंबा, चिकू आणि मोसंबीची बाग आहे. ११० फूट खोल विहीर आहे. या विहिरीची पाहणी केल्यानंतर पथकाला धक्काच बसला. विहीर खोल करूनही त्यात थोडेच पाणी दिसत असल्याने पथकातील सर्वांनीच चिंता व्यक्त केली. विभागीय आयुक्त दांगट यांनी नरवडे हे प्रगतिशील शेतकरी असल्याचे पथकाला सांगितले. मात्र, त्यांच्या शेतातील फळबाग जळून गेल्याचे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. ज्या झाडांना फळे आहेत, त्यांचे वजन कमी भरणार असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे नरवडे यांनी सांगितले.

पाण्याची व्यवस्था करा
पथकानेसुरुवातीला आडुळातील एकनाथ डवले यांच्या शेतीची पाहणी केली. सहा एकरमध्ये कापूस आणि तूर आहे. मात्र, दोन्ही पिके येण्याची शक्यता नाही. पथकाने त्यांना शेतीत खत कोणते वापरले, त्यावरील खर्च अाणि पाण्याची सुविधा आहे का, याची विचारणा केली. एकतुनीतील बाबू रायसिंग चव्हाण यांच्या शेताची पाहणी केली. चव्हाण यांनी शेतात चार बोअर घेऊनही पाणी लागले नाही. त्यामुळे बागा जळाल्याचे सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी शेततळी देण्याची मागणी केली. शेततळी फक्त कागदावर आहेत. ती शेतात यावीत, असा आग्रह त्यांनी केली. विशेष म्हणजे या पथकात अधिकाऱ्यांनी जनावरांना चारा कुठून मिळतो, अनुदान मिळाले काय, जनावरांना लशी दिल्या जातात काय, अशा सर्वच गोष्टींची विचारणा केली.
मंदाबाई धारकर यांच्याशी चर्चा करताना मल्होत्रा.

शेंगाच नाहीत
पाचोडमध्येमंदाबाई धारकर यांच्या शेतातील कापूस आणि तुरीची पथकाने पाहणी केली. धारकर यांना तुरीचे एकरी उत्पादन किती होईल, असे पथकाने विचारले. शेंगाच लागल्या नाहीत, तर उत्पादन कसे होणार, असे उत्तर मंदाबाईंनी दिल्याने अधिकारी अवाक् झाले.

पथकात कुणाचा सहभाग
पथकामध्येअॅग्रिकल्चर अँड फार्मर वेल्फेअर कृषी भवन दिल्लीचे आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा, पशुसंवर्धन आणि मत्स्य विभागाचे सहआयुक्त एच. आर. खन्ना, कॉटन डेव्हलपमेंट नागपूरचे संचालक आर. पी. सिंग, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, आमदार संदिपान भुमरे यांची उपस्थिती होती.