आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवबा घडवण्याची ऊर्जा महिलांमध्येच : माणिक निंबाळकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांचे कार्यकर्तृत्व शेकडो वर्षे प्रेरणा देणारे आहे. अशा शिवबांना घडवण्याचे श्रेय जिजाऊंना आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना घडवणे आपल्यापुढील आव्हान आहे. त्यामुळे पुन्हा शिवबा घडवण्याची ऊर्जा आपल्यातच आहे, असे प्रतिपादन तुळजाई मराठा देशमुख महिला आघाडीच्या अध्यक्षा माणिक निंबाळकर यांनी केले. 
 
एन -६ येथे जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी अॅड. आरती देशमुख, प्रा. नीलिमा देशमुख उपस्थित होत्या. निंबाळकर म्हणाल्या की, काळाच्या ओघात महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली. मुघल आणि निझाम साम्राज्याच्या काळात हिंदवी स्वराज्याचे लक्ष्य जिजाऊंनी मुलामध्ये रुजवले. अतिशय मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले होते. 
 
टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात मुलांना चांगल्या-वाईटाचा फरक समजावणे आणि त्यावर ठाम राहण्याची प्रेरणा देणे आवश्यक आहे. हुंड्याच्या प्रथेमुळे महिलांचा बळी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी आपणच चळवळ उभी केली पाहिजे. आपल्या समाजातही मुली उच्च शिक्षण घेत आहेत. विविध आघाड्यांवर यश मिळवत आहेत. त्यामुळे सून घरी आणताना हुंडा घ्यायचा नाही असा निश्चय करा. 
 
मुलांना उत्तम संस्कारांनी घडवा म्हणजे आपल्या मुलीही सुरक्षित होतील. अॅड. देशमुख म्हणाल्या, कोणताही नवा बदल करताना विरोध होणार आहे. पण एक पाऊल टाकले की पुढची वाट बनत जाते याची अनेक उदाहरणे आहेत.
 
आजच्या काळात मुलांना नैतिकता शिकवणे आणि मुलींना अधिकाधिक बळकट बनवणे अशी दुहेरी जबाबदारी आपल्यावर आहे. समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची धुरा आपल्याच हाती आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत आपण आपली जबाबदारी निभावली तर येणारा इतिहास महिलांना मानाचा सलाम करेल यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले. 
 
या वेळी अलका चव्हाण, छाया देशमुख, ज्योती पतंगे, प्रतिभा देशमुख, संगीता देशमुख, डॉ. अस्मिता निंबाळकर, सुवर्णा देशमुख, स्वाती देशमुख, राजश्री देशमुख, आकस्मिता देशमुख, रेणुका देशमुख, कादंबरी देशमुख, नीलिमा शितोळे, आशा देशमुख आणि वृषाली देशमुख यांची उपस्थिती होती. 
 
समाज बदलण्याचे कौशल्य आपल्यात : प्रा. देशमुख : समाज परिवर्तनाचा अभ्यास केला तर हे लक्षात येईल की, समाजात अामूलाग्र बदल महिलांनीच घडवून आणले. विशेष म्हणजे हे घडवताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा नेटाने सामना केला. जिजाऊंनी मुस्लिम राजवटीविरुद्ध लढा दिला, तर सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाच्या वाटा खुल्या केल्या. आजच्या काळात तंत्रज्ञानाच्या मोहिनीतून मुलांना वाचवणे, उत्तम संस्कार देणे हे आपण मोहीम म्हणून हाती घ्यायला हवे.