आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनातील अारोपीला सहा वर्षांनंतर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.चित्रा डकरे खून प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी शहरातील १५ पोलिस ठाण्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींचा शोध सुरू आहे. या शोधमोहिमेदरम्यान रविवारी मध्यरात्री मुकुंदवाडी पोलिसांना भारतनगर येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनातील आरोपी सापडला. धारासिंग थावरा जाधव (४५) असे आरोपीचे नाव आहे.

रंगपंचमीच्या दिवशी टेप लावून नाचताना अचानक टेप बंद झाल्यामुळे संतापलेल्या धारासिंग जाधवने बंडू ऊर्फ पंडित जाधव यांच्या छातीवर बसून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना २००९ मध्ये गारखेडा परिसरातील भारतनगर येथे घडली होती. खून केल्यानंतर धारासिंग पोलिसांना चकवा देत फरार झाला. तब्बल सहा वर्षांनंतर मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. ११ मार्च २००९ रोजी धुळवडीच्या दिवशी संतोष राठोड यांच्या घरासमोर टेप सुरू असल्यामुळे बंडू जाधव हा आपल्या मित्रांसोबत नाचत होता. दुपारचे अडीच वाजले असल्याने आता धुळवड संपली, असे म्हणत संतोषने घरात जाऊन टेप बंद केला. टेप बंद केल्याने नाचणाऱ्या सुरेश रंगनाथ राठोड, संतोष राठोड, नीलेश ऊर्फ किसन राठोड आणि धारासिंग थावरा राठोड यांनी बंडूला बेदम मारहाण केली. धारासिंगने त्याच्या छातीवर, पायावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. बंडूची आई कमलाबाई जाधव यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश राठोड, संतोष राठोड आणि नीलेश राठोड या तिघांना अटक केली होती, परंतु मुख्य आरोपी धारासिंग फरार होता.

सहा वर्षांत धारासिंग हा तीन गावे फिरला. २००९ मध्ये घटना घडल्यानंतर तो लातूर येथे गेला. त्या ठिकाणी त्याने मिस्त्रीकाम केले. त्यानंतर तो मुंबईतील विरार येथे राहिला. काही दिवसांनी तो मंठा तालुक्यातील बेलोरगावात आला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू असताना धारसिंग हा बेलोरगावात असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हारुण शेख, कैलास काकडे, प्रकाश सोनवणे, विलास डोईफोडे यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
बातम्या आणखी आहेत...