आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कायवॉकचे 50 लाख हवेत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानाजवळ थाटात सुरू केलेला स्कायवॉक सदोष रचना आणि चुकीच्या जागी उभारल्यामुळे निव्वळ निरुपयोगी ठरला आहे. दिवसातून 100 लोकांपेक्षा अधिक लोक त्याचा उपयोग करत नाहीत, त्यामुळे मनपाने त्यावर खर्च केलेले 50 लाख ‘हवेत’ विरल्याचेच चित्र दिसून येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यान येथे दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र, प्रचंड वाहतूक असणारा हा रस्ता ओलांडण्यासाठी सोयच नव्हती. भरधाव वाहनांमधून मार्ग काढत नागरिकांना रस्ता ओलांडावा लागायचा. त्यामुळे येथे स्कायवॉक अथवा भुयारी मार्ग केला जावा, अशी मागणी 2008 पासून होत होती. सतत घडणार्‍या अपघातांमुळे या मागणीने जोर धरला आणि अखेर मनपाने स्कायवॉक उभारणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. 60 मीटर रुंदीच्या या रस्त्यावर स्कायवॉकला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी 2011 मध्ये आला. काम पटेल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवण्यात आले. त्यांनी बांधकाम साहित्य आणून ठेवले; पण काम सुरू होणे लांबत गेले. परिणामी, कामाची किंमत वाढली.

अखेर मनपाने त्यात आणखी 20 लाखांची भर घातली आणि स्कायवॉक 50 लाखांचा करण्याचे ठरले. त्यानंतर 2012 मध्ये या कामाला प्रारंभ झाला. आठ महिन्यांत तो उभारलाही गेला; पण त्याच्या पायर्‍याच तयार नसल्याने नुसताच स्कायवॉक रस्त्यावर लटकत राहिला. त्यालाही 2013 च्या प्रारंभीला मुहूर्त मिळाला आणि एकदाच्या पायर्‍या लागल्या. पण त्याचा वापर पूर्णपणे झाला नाही व होत नाही.

मोजकेच लोक वापतात
‘दिव्य मराठी’ने या स्कायवॉकचा किती वापर होतो हे तपासले असता, अध्र्या तासात अवघ्या 8 जणांनी त्याचा वापर केला. त्यात दोन कुटुंबे सामानसुमानासह होती. दुसरीकडे रस्त्याच्या तुटक्या डिव्हायडरच्या खिंडीचा वापर करून जथ्थ्याने लोक इतर भागातून रस्ता ओलांडत होते. त्याचा वाहतुकीवरही परिणाम होताना दिसून आला.

वायफळ खर्च
या भागात स्कायवॉकऐवजी भुयारी मार्ग केला असता, तर अधिक सोयीचे झाले असते. भुयारी मार्गात दुकाने सुरू करून बेरोजगारांना रोजगारही देता आला असता व त्यामाध्यमातून मनपाला उत्पन्नही मिळू शकले असते. - समीर राजूरकर, नगरसेवक

जागाच चुकल्याने हा स्कायवॉक म्हणजे नुसता शोपीस झाला आहे. एक तर तो वेळेत न केल्याने मनपाला भुर्दंड बसला आणि चुकीची रचना व जागा यामुळे त्याचा काडीचाही वापर होताना दिसत नाही. - विजेंद्र जाधव, नगरसेवक

काय आहेत कारणे?
0 स्कायवॉकला दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 48 पायर्‍या आहेत. हा जिना पुरेसा लांब केला नसल्याने पायर्‍या चढण्यास अवघड आहेत.
0 स्कायवॉकची जागाच चुकीची असल्याने त्याचा वापर होऊ शकत नाही.
0 हा स्कायवॉक एक तर सिद्धार्थ उद्यानाच्या समोर असायला हवा किंवा थेट बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ.
0 उद्यान आणि बसस्थानक यांच्या मध्ये हा स्कायवॉक असल्याने प्रवासी सामानासह एवढे अंतर चालत एकूण 96 पायर्‍यांची चढ-उतार करू शकत नाहीत आणि सिद्धार्थ उद्यानातून येणार्‍यांनाही उलटा फेरा मारावा लागत असल्याने तेही येत नाहीत.

जुगारी, दारुड्यांसाठी मिळाली जागा
अवघड पायर्‍यांमुळे या पुलाचा वापर होतच नसल्याने सायंकाळनंतर येथे जुगारी, गांजेकस, दारुड्यांचा वावर सुरू झाला आहे. त्यांना त्यांच्या व्यसनात अडथळे येऊ नये म्हणून मनपाने ही जागा उपलब्ध करून दिली की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी या पुलाचा वापर करण्यासही नागरिक धजावत नाहीत, असे परिसरातील दुकानदारांनी सांगितले.