आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- ‘काय सांगायचं, एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, उस्मानाबाद तालुक्यातील भानसगावचे द्राक्ष बागायतदार सुधाकर तुळजापुरे सांगत होते. ‘सोमवारी रात्री द्राक्ष बागेचा सौदा झाला, मी बागवानाकडून इसार बी घेतला अन् रात्रीच धडाधडा आवाज करीत गारपीट झाली. पोटच्या लेकरापरमाणं वाढवलेलं द्राक्षमणी, घड समदं गाराच्या मार्याने खल्लास झालं. पाच ते सात लाखांला घर बसलं, आता दोन-तीन वरस तरी उजांग पडणार नाही, बघा.’ हे सांगताना सुधाकररावांचा गळा दाटून आला होता. गारपीटग्रस्त शेतकर्याची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. गारपिटीने शेतकर्याचे आर्थिक गणितच बिघडवले. त्यातून सावरण्यासाठी त्याला दोन ते तीन वर्षे लागणार आहेत.
गटशेतीचे प्रणेते आणि आंबातज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले,या संकटामुळे राज्यात सुमारे 13 लाख हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. त्यापैकी एक लाख हेक्टरवरील फळबागांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यात केशर आंबा मोठय़ा प्रमाणात आहे. गारपिटीमुळे एक हेक्टर केशर आंबा बागेमागे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. या बागायतदारांना आता एक वर्ष कसलाच आर्थिक आधार नाही. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात केशर आंबा व मोसंबीच्या बागांना आधी दुष्काळामुळे आणि आता गारपिटीने या बागायतदारांना दुहेरी फटका बसला आहे. त्यांची गाडी रुळांवर येण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
गणित बिघडले
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे मत हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. त्यांनी फळबागांचे आर्थिक गणित मांडले. त्यांच्या मते, एक हेक्टर मोसंबी बागेतून साधारण दोन ते 10 टन उत्पादन मिळते. सध्याचा मोसंबीचा 7 ते 10 हजार रुपये प्रतिटन भाव गृहीत धरल्यास उत्पादन खर्च वजा जाता त्या बागायतदाराला एक लाख रुपये नफा मिळतो. सध्या मृग बहराची मोसंबी काढणीयोग्य झाली होती, मात्र गारपीट झाली आणि सारे गणितच बिघडले. डाळिंबाच्या बाबतीतही हस्त बहराची डाळिंबे सध्या विक्रीसाठी तयार होती, मात्र अवकाळी पावसाने डाळिंब बागायतदाराला हेक्टरी मिळणारा दीड लाख रुपयांचा नफा मातीमोल झाला.
फळबागनिहाय नुकसान
फळपीक : नुकसान
केशर आंबा : हेक्टरी 2.5 लाख रुपये
द्राक्ष : हेक्टरी पाच ते सात लाख रुपये
मोसंबी : हेक्टरी एक लाख रुपये
डाळिंब : हेक्टरी दीड लाख रुपये
गहू, ज्वारी : हेक्टरी 40 ते 50 हजार रुपये
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.