आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गार’द शिवार: निम्मे रब्बी पीक नेस्तनाबूत; अवकाळी पावसाचे 15 बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या गारपिटीने शनिवारपर्यंत 19 लाख हेक्टरवरील रब्बी पिकांपैकी शनिवारी सायंकाळपर्यंत 5 लाख 91 हजार 252 हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरील रब्बीची पिके गारद झाली आहेत. या 15 दिवसांत अवकाळी पावसाने विभागात 15 जणांचा बळी घेतला. गारांचा मारा असह्य झाल्याने 451 जनावरे दगावली आहेत. पक्षी आणि वन्यप्राण्यांची आकडेवारीच समोर येऊ शकलेली नाही.

विभागात 274 कुटुंबे बेघर झाली असून, 2409 घरांची मोठी पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या कृषी विभागाचे पथक मराठवाड्यातील हाहाकार पाहण्यासाठी बुधवारपासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत असून ते नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांचा दौरा करण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या दौर्‍याची रूपरेषा स्पष्ट होऊ शकली नव्हती. राज्यातील अन्य भागातही हे पथक जाणार आहे.

नेमका आकडा येण्यास वेळ : नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले हे आताच स्पष्ट होत नाही. सूत्रांनुसार निम्मे क्षेत्र नेस्तनाबूत झाले असण्याची भीती आहे. गारपीट थांबली तर तीन दिवसांत नुकसानीचा प्राथमिक अंदाज येऊ शकतो, मात्र गारपीट सुरूच राहिली तर मात्र निश्चित आकडा समोर येण्यास वेळ लागेल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 2.65 लाखांपैकी 1.96 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यात 53,169 हेक्टरवर ज्वारी, 50,953 हेक्टरवर गहू, 40, 402 हेक्टरवर हरभरा, 13, 921 हेक्टरवर मका आहे. पाणी पुरेसे असल्याने यंदा ही पिके चांगली आली होती.

मुख्यमंत्री चव्हाण, राज आज येणार : शरद पवार, गोपीनाथ मुंडेंपाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवार व बुधवारी पाहणी करतील. लातुरातील औसा व उस्मानाबादेतील तुळजापूरला ते जातील. मनसेचे प्रमुख राज ठाकरेही मंगळवारी मराठवाड्यात आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडेदेखील मंगळवारी नुकसानीची पाहणी करणार आहेत.

धान्य काळवंडले, भाव घसरले ज्वारी 1520, गहू 1501 रुपये
गारपिटीमुळे ज्वारी काळवंडली असून, गव्हाचा रंग भुरकट झाला आहे. त्यामुळे सोमवारी गारपिटीतील ज्वारी 13 ते 15, तर गहू 15 ते 17 रुपये किलो भावाने विकला गेला. बाजार समितीतही ज्वारीला 1,520, तर गव्हाला 1,501 रुपये क्विंटल भाव होता. हमीभावापेक्षा हा दर 250 ते 50 रुपये कमी आहे. दर्जेदार ज्वारी 25, तर गहू 23 रुपये किलो होता. दर्जेदार धान्याचे भाव वाढतील, असे विक्रेते सुभाष पाखरे म्हणाले.

पुढील 48 तासांत गारपिटीची शक्यता
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात येत्या 48 तासांत आणखी गारपिटीची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. ध्रुव प्रदेशाकडून वाहणारे थंड वारे आणि समुद्रावरून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांची परस्परांत होणार्‍या घुसळण यामुळे गारपीट होत आहे.

>15 लाख हेक्टर एकूण नुकसानीचा अंदाज
>9.40 लाख हेक्टर पिके उद्ध्वस्त
>17 जणांचा मृत्यू
>900 पशू गतप्राण
>27 जिल्ह्यांना राज्यात फटका