आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small Business License Permission Stop Midc Aurangabad

टायनी इंडस्ट्रीचे पंख छाटले; औद्योगिक सोसायट्यांना परवानगी बंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरात 1993 मध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीत किरण दिंडे या तरुणाने औरंगाबाद औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. अतिशय छोट्या भांडवलातून उद्योग सुरू करणा-यांना जागा देणे, हा या सोसायटीचा उद्देश होता. 1998 मध्ये वाळूजमध्ये सी-252 सेक्टरमध्ये 60 छोटे भूखंड होतकरू तरुणांनी घेतले. तेथे मोठ्या उद्योगांना लागणारी कामे ते करून देऊ लागले. यातील बहुतांश उद्योजक हे पूर्वी कामगार होते. दहा-पंधरा वर्षांच्या अनुभवातून ते स्वत:च्या हिमतीवर उद्योजक झाले. त्यांची यशोगाथा आजपर्यंत समोर आलेली नाही. कारण ते एवढे मोठे उत्पादन छोट्या जागेत करतात याची जगाला माहितीच नाही. ‘डीबी स्टार’ने या टायनी इंडस्ट्रीचा धांडोळा घेतला तेव्हा या सर्व उद्योजकांचा परिचय झाला. जेमतेम शिक्षण असले तरी अनुभवाच्या शाळेत जणू त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यामुळेच अत्यंत माफक दरात मोठ्या उद्योजकांना ते अवघड जॉब तयार करून देतात.
औद्योगिक सोसायट्यांचा विस्तार ठप्प - वाळूज येथे सी-सेक्टरमध्ये 60 गाळे आहेत. डी-सेक्टरमध्ये 78 गाळे, के-सेक्टरमध्ये 20 गाळे, तर शेंद्रा येथे 40 गाळे आहेत. बहुतांश गाळे 500 चौ. फूट आकाराचे आहेत. 15-20 वर्षांपूर्वी या जागा तीस हजार रुपयांत मिळाल्या. उद्योजकांनी गाळे स्वत: बांधले तेव्हा तो खर्च दीड ते दोन लाखांवर गेला. एवढ्या भांडवलात अनेक गरीब, होतकरू कामगार उद्योजक बनले. ते सर्वजण आज मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत; पण त्यांना सरकार जागाच देत नाही. हे उद्योजक 25 लाखांपासून 15 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करत आहेत. 2004 पासून एमआयडीसीत औद्योगिक सहकारी सोसायट्यांना भूखंड देणे सरकारने बंद केले.
नॅनोचे पार्ट तयार केले - केवळ आयटीआय झालेल्या बालाजी बोड्डावार यांची प्रगती थक्क करणारी आहे. नांदेड येथून नोकरीच्या शोधात आलेला हा तरुण आज डी-सेक्टरमध्ये फक्त पाचशे चौ. फूट जागेत बालाजी इंजिनिअरिंग नावाने स्वत:चे युनिट चालवतो. आठ वर्षे कंपनीत काम केल्यावर त्यांनी उद्योग सुरू केला. ते नॅनो कारसाठी लागणारा एक सुटा भाग तयार करतात. जो पार्ट बाजारात सीएनसी मशीनवर 9 रुपयांत मिळतो, तोच पार्ट त्यांनी दोन रुपयांत तयार करून दिल्याने त्यांना नॅनोची मोठी आॅर्डर मिळाली. आता त्यांना मोठी जागा हवी आहे; पण तेच ते आणि तेच ते...
मालकाने मोठे केले - वाळूजमधील डी-सेक्टरमध्ये विष्णू ढिवरे यांची पाच युनिट्स आहेत. अत्यंत छोट्या जागेत ते मोठ्या उद्योजकांच्या बरोबरीने काम करीत आहेत. नेहा इंजिनिअरिंग नावाने ते कंपनी चालवतात. त्यात सर्व प्रकारचे मशीन कॉम्पोनंट तयार होतात. सध्या ते तीनचाकी रिक्षाला लागणारे गिअर तयार करतात. 1992 मध्ये अकोला येथून ते नोकरीच्या शोधात आले. वाळज येथील संजीव आॅटो पार्ट कंपनीत काम करू लागले. मेहनतीने ते मशीन आॅपरेटर पदापर्यंत पोहोचले. संजीव आॅटो पार्टचे मालक संजय ताम्हणकर यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांनी 1998 मध्ये छोटा गाळा घेऊन उद्योग सुरू केला. आज ढिवरे यांची उलाढाल 12 कोटींवर पोहोचली आहे. आता मोठ्या जागेची त्यांना गरज आहे. पण...
जगाची सफर केली - बी.ई. ढवळीकर हे मूळचे बीड जिल्ह्यातले. त्यांनी कामगार म्हणून पंधरा वर्षे मशीन शॉपवर अनेक छोट्या -मोठ्या कंपन्यांत काम केले. औरंगाबाद औद्योगिक सहकारी संस्थेत वाळूज येथे सी-सेक्टरमध्ये त्यांनी 1998 मध्ये छोटा गाळा घेतला आणि तेथे जॉबवर्क सुरू केले. सर्व प्रकारचे प्रिसिजन वर्क, गिअर कटिंगची कामे ते करतात. सूक्ष्म उद्योगातून त्यांनी मोठी भरारी घेतली. ते जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, मलेशिया हे देश फिरून आले. आता मुलगा एम.बी.ए. झाला आहे. सीएनसी मशीन घेऊन त्याला विस्तार करून द्यायचा आहे; पण औद्योगिक वसाहतीत जागाच मिळत नाही.
खुर्ची बदलली - श्रीपाद सावरगावकर हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. व्हिडिओकॉन कंपनीत त्यांनी दहा वर्षे नोकरी केली. त्यानंतर छोट्या भांडवलात डी-सेक्टर सोसायटीत छोटा गाळा घेतला. उद्योजक व्हायचे, असा ध्यासच त्यांनी घेतला होता. पूर्वी एम्प्लॉई होतो, आता एम्प्लॉयर झालो. आता खुर्ची बदलली, असे ते अभिमानाने सांगतात. ते मेटल शीटचे उत्पादन करतात. वर्षाला चार कोटींची उलाढाल आहे. आॅर्डर्स वाढतच आहेत; पण जागा मिळत नाही. त्यांना आता 5 हजार चौ. फूट जागा हवी आहे.
आयुष्य बदलले - चंद्रकांत जाधव हे तर बार्शी येथून उच्च् शिक्षणासाठी आले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम. ए. (भूगोल) केले. अनेक कंपन्यांत काम केले. वाळूज भागात स्वत:चे दुकान चालवले. कीर्ती प्रेसिंगचे मालक बाहेकर यांनी संधी दिली अन् आयुष्यच पालटले. डी-सेक्टरमध्ये छोट्याशा जागेत त्यांनी व्यवसाय सुरू केला. मालकाने संधी दिली नसती तर कदाचित दुकानदारच राहिलो असतो, असे ते अभिमानाने सांगतात.
फिक्श्चरचा निर्माता - फिक्श्चर हा प्रकार इंजिनिरिंग कंपन्यांना चांगला ठाऊक असतो. भल्याभल्यांना हे उत्पादन जमत नाही. यात खूप अचूकता लागते. थोडे जरी चुकले तर उत्पादन रिजेक्ट होते. असे अवघड उत्पादन तयार करणारे चिमाजी सोनवणे सी-सेक्टरमध्ये आहेत. केवळ दहावी उत्तीर्ण असलेले सोनवणे आज यशस्वी उद्योजक बनले आहेत. कामगार ते उद्योजक असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. त्यांना आता पाच हजार चौ. फूट जागा पाहिजे; पण ती मिळत नाही.
एमआयडीसीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टी.अमलगम यांना थेट सवाल
*औद्योगिक सहकारी संस्थांवर सरकारने बंदी का आणली ?
-हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. याबाबत मी भाष्य करू शकणार नाही.
*या उद्योजकांचे काम खूप चांगले सुरू आहे. तरी जागा का नाही ?
-उद्योजक चांगले काम करत असतील आणि त्यांना जागा हवी असेल तर ती देण्यास काहीच हरकत नाही.
*पण भूखंड वाटप समितीची बैठकच होत नाही. जागा मिळणार कशी?
आता ही बैठक लवकरच होणार आहे.
*लवकर म्हणजे कधी?
-निवडणुका संपल्या की तत्काळ या बैठका राज्यभर होतील. त्यात सर्व निर्णय होतील. बैठका फेबु्रवारी व मार्चमध्ये होतील.
तरुणांवर अन्याय - 1993 मध्ये छोट्या उद्योजकांसाठी सी, डी आणि के सेक्टरमध्ये ही वसाहत सुरू केली. हा प्रयोग खूप यशस्वी झाला आहे. कारण कामगारही उद्योजक होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले; पण 2004 पासून शासनाचे धोरण बदलले. - किरण दिंडे, अध्यक्ष, औरंगाबाद औद्योगिक सोसायटी