आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पंढरपुरात दाखल होणार दीडशे दिंड्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- आषाढी एकादशीनिमित्त यात्रेसाठी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शहराजवळील छोटे पंढरपूर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. परिसरातून सुमारे दीडशेवर दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा मंदिराच्या सभोवताली 10 सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर राहणार आहे, तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सोमवारी दिली.
आषाढी एकादशी 9 जुलै रोजी असून श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे व मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात झिकझॅक पद्धतीचे लाकडी संरक्षक कठडे लावण्यात आले आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गावरील तिरंगा चौक ते कामगार चौकदरम्यानची वाहतूक एमआयडीसीमार्गे वळवली आहे. या वेळेस पाऊस नसल्याने गर्दी दुपटीने वाढण्याची शक्यता गृहीत धरून मुखदर्शनासाठी दिंडीसाठीच्या प्रवशेद्वाराजवळ व मंदिराच्या दर्शनी भागात दोन दूरचित्रवाणी संच ठेवून तेथे मूर्तीचे थेट प्रक्षेपण, 300 गणवेशातील स्वयंसेवक मदतीसाठी तैनात राहणार आहेत. कामगार चौक व तिरंगा चौकातील अब्बास पेट्राल पंपसमोरील मैदानावर भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था राहणार आहे.
भाविकांची संख्या वाढणार

आषाढीनिमित्त पंढरपुरात भरणा-या यात्रेत शहराच्या विविध भागांसह ढोरेगाव, प्रवरा संगम, लांझी, शिवराई, तुर्काबाद, दहेगाव बंगला, जिकठाण, पिंपरखेडा, रांजणगाव शेणपुंजी, करोडी, वाळूज, बजाजनगर, जोगेश्वरी, नायगाव, पाटोदा परिसरातून निघालेल्या दिंड्या दाखल होतात. या वेळी दिंड्यांत वाढ होणार असून त्यांची संख्या दीडशेंवर जाणार असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता पोलिस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मंदिराभोवती 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मंदिरालगतच्या पोलिस कंट्रोल रूमलगत ऑपरेटिंग व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
खेळणी दाखल
विविध खेळणी, झोपाळे, रहाटपाळणे, मौत का कुआँ, फिरते सिनेमागृह यात्रेनिमित्ताने दाखल होत आहेत. एक दिवस भरणारी ही यात्रा परिसराचे श्रद्धास्थान असल्याने तिला मोठे महत्त्व आहे.