आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुउद्योजकांना 25 लाखही नाहीत, बड्यांना 50 कोटींचे सहज कर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मोठय़ा उद्योजकांना 50 कोटींचे कर्ज सहज मिळते. मात्र, उद्योगाचा कणा असलेल्या लघुउद्योजकांना 25 लाखांचे कर्ज मिळवण्यासाठीही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. शिवाय लघुउद्योजकांना व्याजाचा दर एक ते दीड टक्क्याने अधिक असतो.

उद्योग सुरू करण्यापासून तो चालवण्यापर्यंत लघुउद्योजक पूर्णपणे बँकांवर अवलंबून असतात. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळवताना त्यांच्यासमोर अनंत अडचणी आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव को-ऑपरेटिव्ह सेक्टरचा आधार घ्यावा लागत असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. राष्ट्रीयीकृत बँकांकडून लघुउद्योजकांना 11.75 टक्के दराने कर्ज मिळते; पण ते कर्ज हवे तेव्हा मिळत नसल्याने तातडीची गरज भागवण्यासाठी उद्योजकांना सहकारी बँकांकडून 13 ते 14 टक्के व्याजदराने कर्ज घेणे भाग पडते. त्यामुळे उत्पन्नातील मोठा हिस्सा व्याज भरण्यातच जातो. मोठय़ा उद्योगांना एक ते दीड टक्के कमी व्याजदराने कर्जपुरवठा होतो.

करारासाठी प्रतीक्षा
कर्ज घेण्यासाठी लघुउद्योजक बँक, उद्योजक आणि एमआयडीसीचे अधिकारी असा ‘ट्राय पार्टी अँग्रीमेंट’ (त्रिस्तरीय करार) करतात. मात्र, त्यासाठी एमआयडीसीकडून पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागतो. यात कर्ज घेताना लघुउद्योजकांना जमीन ‘मॉडगेज’ करून बँकेला द्यावी लागते. यावर बँक अधिकारी, लघुउद्योजक आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांच्या सह्या असतात. मात्र, एमआयडीसीकडून सह्या मिळवण्यास विलंब होतो.

कागदपत्रांची जमवाजमव त्रासदायक
लघुउद्योजकांना कर्ज देताना बँका अविश्वास दाखवतात. कर्जासाठी कागदपत्रांची जमवाजमव त्रासदायक आहे, तर ट्राय प्रॉपर्टी अँग्रीमेंटदेखील एमआयडीसीकडून एका दिवसात होणे अपेक्षित असताना महिनाभराचा कालवधी लागतो. लघुउद्योगांना लवकर कर्ज मिळत नसल्यामुळे नाइलाजाने सहकारी बँकांकडून 14 टक्क्यांपर्यंत व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे. व्याजदर जास्त असले तरी लघुउद्योजक कर्जाचे हप्ते न चुकवता फेडतो. भारत मोतिंगे, उद्योजक.

कर्ज सहज मिळावे
मोठय़ा उद्योगांना 50 कोटींचे कर्ज सहज मिळू शकते. मात्र, लहान उद्योगांना पाच लाखांपासूनचे कर्ज मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागते. मोठय़ा कंपन्या त्यांच्याकडील उच्च्शिक्षित स्टाफच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता करतात. मात्र, लघुउद्योजक सर्व कागदपत्रे एकटाच जमा करतो. त्यामुळे तो बेजार होतो. त्यांना सहज कर्ज मिळाले तर उद्योगाची प्रगती वेगाने होईल. - उल्हास गवळी, उद्योजक.

कागदपत्रांची कमतरता
कागदपत्रांची पूर्तता करण्यात लघुउद्योजक मोठय़ा उद्योजकांच्या तुलनेत मागे राहतात. मोठय़ा कंपन्या बॅलेन्स शीट, आयटी रिटर्न्‍स, गॅरंटी इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करतात. मात्र, लघुउद्योजकांची उलाढाल असताना बॅलेन्स शीट नसते, तर व्याजदर क्रेडिट रेटिंगवर ठरतात. मात्र, आता बँकांकडून लघुउद्योगांना मोठय़ा प्रमाणात कर्ज वितरित होत आहे. - शिवचरण फोकमारे, रिजनल मॅनेजर, एसबीआय.