आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीतील नागरिकांना कर भरण्यासाठी अाता ‘स्मार्ट’ अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असून त्यानुसार स्मार्ट कामे करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. नागरिकांना घर किंवा आॅफिसमध्ये बसल्या जागी मालकत्ता कर भरता यावा तसेच विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यासह त्यांच्या तक्रारीही प्राप्त करण्यासाठी मनपाने अँड्रॉइड मोबाइल अॅप तयार केले आहे. महाराष्ट्र नागरी ई-गव्हर्नन्स प्रकल्पातून हे अॅप तयार करण्यात आले असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

राज्यातील महानगरपालिकांना विविध प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एबीएम या संस्थेने महानगरपालिकेला त्यांच्या मागणीनुसार हे ई-म्युनिसिपालटी नावाचे अॅप तयार करून दिले आहेत. स्मार्ट सिटीत समावेशानंतर मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी हे उचललेले पहिले पाऊल असून मंगळवारपासून हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरात विविध प्रकारच्या सुविधा देण्यासह नागरिकांनाही स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरिकांना मालमत्ता कर, गेल्या वर्षीचा कर, लावलेल्या दरासह कराचा भरणाही याच अॅपवरून करता येईल. अॅपमुळे नागरिकांना आता कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. मनपाची नोटीस आल्यानंतरच कर भरण्यासाठी घाई करणाऱ्यांना नोटीस येण्यापूर्वीच आपल्या कराची माहिती उपलब्ध होऊ शकेल. ज्यांनी हे अॅप इन्स्टॉल केले, त्यांनी आपल्या घराचा नंबर अॅपने विचारलेल्या ठिकाणी टाकल्यास तत्काळ मालमत्ता कराची माहिती समोर येते. त्यानुसार नागरिकांना कर भरण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती संगणक सिस्टिम मॅनेजर अब्दुल बारी पटेल यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...