आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीचे काम सहा महिन्यांत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 20 लाख लोकांना सामावून घेणार्‍या स्मार्ट सिटीच्या कामाला येत्या सहा महिन्यांत प्रारंभ होणार असून सहा वर्षांत हे नवे हायटेक शहर विकसित होणार आहे. औरंगाबादचे रूप आणि अर्थव्यवस्था पालटवून टाकणार्‍या डीएमआयसीच्या कामाला गती येणार असून पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि करमाड येथे रेल्वे यार्ड लॉजिस्टिक पार्कचे काम सुरू होणार आहे.

डीएमआयसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, राज्याचे प्रधान उद्योग सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये तळ ठोकून होते. प्रशासकीय पातळीवर कामांना गती देण्यासाठी, सद्य:स्थितीची माहिती घेण्यासाठी अमिताभ कांत यांनी शनिवारी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याशी चर्चा केली. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत आणि करमाड येथे भेट देऊन पाहणी केली.

प्रस्तावित जागांची पाहणी

अमिताभ कांत यांनी शनिवारी डीएमआयसीशी संबंधित कामे मार्गी लावली. सकाळी स्थळपाहणी करून कोठे काय होणार आहे, याची माहिती जाणून घेत काही सूचना केल्या. त्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. त्यानंतर करमाडला भेट देत डीएमआयसीमध्ये येऊ घातलेल्या उद्योगांना कच्च्या आणि तयार मालाची ने-आण करण्याकरिता उभारावयाच्या रेल्वे यार्ड लॉजिस्टिक पार्कच्या जागेची पाहणी केली. डीएमआयसीमधील हे दोन्ही प्रकल्प सर्वात आधी हाती घेतले जाणार आहेत.

भूसंपादनाबाबत चर्चा

दुपारच्या सत्रात विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यात भूसंपादन आणि राज्य सरकारशी संबंधित विषयांवर विचारमंथन झाले. भूसंपादनाचे काम कुठवर आले आहे हे त्यांनी जाणून घेतले, शिवाय सरकारकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणखी काय अपेक्षित आहे, याची माहितीही त्यांनी दिली.

टार्गेट 2019

पत्रकारांशी बोलताना अमिताभ कांत यांनी आपल्या दौर्‍यामागचा हेतू सांगत डीएमआयसीच्या कामाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, डीएमआयसीचा हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. शेंद्रा-बिडकीन आम्ही अतिशय चांगले विकसित करणार आहोत. पहिला टप्पा स्मार्ट सिटीपासून सुरू होणार आहे. देशात शेंद्रय़ासोबत गुजरातेतील धोलेरा येथे स्मार्ट सिटी विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार लवकरच पाठवले जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस स्मार्ट सिटीचे काम सुरू होणार असून 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल. याशिवाय डीएमआयसीचे प्रारंभीचे प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि रेल्वे यार्ड लॉजिस्टिक पार्कचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामांत सर्वांचे पाठबळ मिळत असून वेळेत हे काम सुरू होऊन पूर्ण होईल असा विश्वास आहे. भूसंपादनाचा विषय मार्गी लागला आहे.