आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीची घोषणा आज होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डिसेंबर रोजी स्मार्ट सिटीचा आराखडा सरकारला सादर केल्यानंतर आता टाॅप २० शहरांची यादी जाहीर होण्याची वेळ आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या २६ जानेवारी रोजी ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून मुंबई औरंगाबादचाच या यादीत समावेश होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.
जुलै महिन्यापासून स्मार्ट सिटीचे वारे वाहत होते. औरंगाबादनेही स्मार्ट सिटीसाठी आपला दावा सादर केला होता. प्राथमिक फेरीत राज्यातील अनेक शहरांना मागे टाकत औरंगाबादची राज्यातील दहा शहरांत निवड झाली. त्यानंतर पुणे, मुंबईसारख्या शहरांची स्पर्धा असताना औरंगाबादने नागरिकांचे मते मागवत, जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आराखडा तयार केला. डिसेंबर महिन्यात तो सरकारकडे सादर करण्यात आला.

आता सारा निर्णय केंद्राच्या हातात आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीबाबत काय हालचाली सुरू आहेत, संभाव्य कोण आहे किंवा औरंगाबादची काय स्थिती आहे याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. देशातील स्पर्धक शहरांनाही काहीच कळवण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीच्या पहिल्या २० शहरांची नावे कधी जाहीर होणार याचीही माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ही यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात जागतिक नकाशावर असलेले स्थान या दोन बाबींमुळे औरंगाबादने मजल मारली आहे. आगामी काळात औरंगाबादची होणारी वाटचाल पाहता शहराला स्मार्ट सिटीचा बुस्टर डोस दिला जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या समावेशाबाबत जातीने लक्ष घातल्याने मुंबईचाही समावेश होऊ शकतो.