आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीतील गाळ उपशाने या वर्षी सुरळीत पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी मृत साठ्यावर पोहोचताच पाणीपुरवठ्यात होणाऱ्या विस्कळीतपणावर आता काही प्रमाणात लगाम बसला आहे. प्रशासनाने २०१३ मध्ये राबवलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. जायकवाडी मृत साठ्यावर पोहोचूनही सध्या औरंगाबादसह ३५० गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे.
जायकवाडी मृत साठ्यावर आल्यानंतर डाव्या कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात नेहमी अडचणी येत. या ठिकाणी गाळ असल्याने पंपहाऊसपर्यंत पाणी पोहोचण्यात व्यत्यय यायचा. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने २०१३ मध्ये गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. नवीन कालवा व डाव्या कालव्यातील २५ हजार घनमीटर गाळ उपसण्यात आल्याने आज जायकवाडीच्या मृत साठ्यातून औरंगाबाद व जालन्याला सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. डाव्या कालव्यातून मराठवाड्यातील विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी कालव्यातील गाळ काढल्याने औरंगाबादला पाणीपुरवठा होणाऱ्या पंपहाऊसपर्यंत सुरळीत पाणी पोहोचत आहे.
दिव्य मराठी अभियानाने ०.५० दलघमी पाणी बचत
जुलैमध्येच धरणाने मृत साठा गाठला. धरणाच्या पाण्यातून आठ हजार कृषिपंपांच्या साहाय्याने १ दलघमी पाण्याचा उपसा रोज होत होता. पाण्याची गरज लक्षात घेता ‘दिव्य मराठी’ने अभियान राबवल्याने या मोटारीच्या वीजपुरवठ्याचे भारनियमन वाढवण्यात आले. पर्यायाने रोजच्या पाण्यात ०.५० दलघमी पाण्याची बचत झाल्याचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

पाणीपातळीची पाहणी
औरंगाबाद कडा कार्यालयाचे मुख्य अभियंता हंगेकर यांनी रविवार दुपारी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीची पाहणी केली. मृत साठ्यातून मराठवाड्याची तहान भागवण्याची कसरत पाटबंधारे विभागाला करावी लागणार आहे. त्या संदर्भात त्यांनी रविवारी कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव, शाखा अभियंता अशोक चव्हाण, पी. आर. बनसोड यांना नियोजनाविषयी माहिती दिली.
पावणेपाच कोटी रुपयांचा झाला खर्च
४ कोटी ८७ लाखांचा खर्च करून अॉगस्ट २०१३ मध्ये हा गाळ काढण्यात आला होता. ३४ हजार घनमीटर गाळ काढण्यात येणार होता. मात्र, केवळ २५ हजार क्युबिकच गाळ त्या वेळी काढला गेला. यामुळे मृत साठ्यातूनही पंपहाऊसपर्यंत सुरळीत पाणी पोहोचत आहे. त्या वेळच्या नियोजनामुळे आज सुरळीत पाणी पोहोचत आहे. दरम्यान, औरंगाबादच्या पंपहाऊसपर्यंत सुरळीत पाणी पोहोचत असले तरी टंचाई लक्षात घेऊन १० टक्के पाणी कपात करण्यात आली अाहे.

होड्यांनी गाळ उपसला
दोन ड्रेजर मशीन होड्यांच्या साह्याने गाळ काढण्यात आला. त्यासाठी तब्बल १ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी २५ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. यामुळे औरंगाबादला सध्या मृत साठ्यातूनही सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. २०१३ मधील गाळ उपशामुळे आगामी काही वर्षे तरी उपयोग होणार आहे. संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे
बातम्या आणखी आहेत...