आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएसद्वारे कळणार मुलींची वर्गातील गैरहजेरी; शिक्षणतज्ज्ञांनी केले स्वागत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याने पालकांना शाळा-महाविद्यालयांत जाणार्‍या पाल्यांची सतत काळजी भेडसावत असते. धकाधकीच्या जीवनात मुलांवर सतत लक्ष ठेवणेही शक्य नाही. त्यामुळे शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनुपस्थित राहणार्‍या विद्यार्थिनींच्या पालकांना एसएमएस पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. पाचवी ते दहावीपर्यंतच्या 2, 230 विद्यार्थिनींना यात सामावून घेण्यात आले आहे.

शाळा-महाविद्यालयाच्या नावाखाली किशोरवयीन पाल्य शिक्षक आणि पालकांची दिशाभूल करत असून मुलींना छेडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा भरल्यानंतर सुटेपर्यंत विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवर असते. त्यामुळे काही अघटित घडू नये व त्याचे खापर शाळेवर फुटू नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर शारदा मंदिर कन्या प्रशालेत एसएमएस पाठवण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच ही सुविधा सरस्वती भुवनच्या इतर संस्थांमध्येही सुरू केली जाईल, असे संस्थेचे सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी
शाळेत जातो असे सांगत विद्यार्थी उपस्थित राहत नाही. पालकांना याची जाणीव असावी व त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून ही सुविधा सुरू झाली. मराठीतही सुविधा सुरू होईल.
-डॉ. अशोक भालेराव, सरचिटणीस, सरस्वती भुवन शिक्षण संस्था.

मुलींनाही धाक राहील
शारदा मंदिर कन्या प्रशालेने स्वत:हून राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे मुलींमध्ये याबाबत धाक राहील. तांत्रिक अडचणी असल्याने शासनस्तरावर तत्काळ असा उपक्रम राबवणे अवघड आहे.
-नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, जि.प.

दररोज तयार होते अनुपस्थितांची यादी
सकाळी आणि दुपारच्या सत्रात पहिल्या तासातच हजेरी घेण्यात येते. त्यानंतर सर्व वर्गांची एकत्रित यादी व्यवस्थापनाकडे दिली जाते. हजेरीपटावर अनुपस्थित असणार्‍या विद्यार्थिनींच्या पालकांना एसएमएस पाठवण्यात येतो. पालकांकडून त्वरित उत्तर आले नाही तर त्यांना फोन करून चौकशी करण्यात येते.

लक्ष ठेवता येईल
या उपक्रमामुळे पालकांनाही मुलांवर लक्ष ठेवता येईल. शाळेत विद्यार्थी अनुपस्थित राहू नये यासाठीदेखील ही प्रक्रिया उपयोगी ठरते. यासाठी संस्थेने एक एसएमएसची सुविधा मिळेल असे सॉफ्टवेअर घेतले आहे. त्यासाठी प्रति एसएमएस 22 पैसे मोजावे लागतील. पालकांचा या सुविधेला प्रतिसाद मिळतो आहे.
-जितेंद्र कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी.

स्तुत्य उपक्रम
पाल्यांना दज्रेदार शिक्षण मिळावे म्हणून आई-वडिलांना नोकरीनिमित्त व्यग्र राहावे लागते. प्रत्येक ठिकाणी पालक मुलांसोबत बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यावर लक्षही ठेवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे शिक्षकदेखील केवळ शाळेच्या वेळेतच सोबत राहतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे आपली मुले कुठे जातात, काय करतात यावर लक्ष ठेवता येईल.
-अनिता शिंदे, पालक.