आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच गावठी पिस्तुले, 12 जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तस्करीच्या माध्यमातून मध्य प्रदेशातून पाच गावठी पिस्तुले शहरात आणणार्‍या जोगेश्वरी येथील गुन्हेगाराला शुक्रवारी सकाळी सव्वासहा वाजता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पाच गावठी पिस्तुले, 12 जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. कर्तारसिंग लक्ष्मीनारायण लोधी-राजपूत (38, रा. हसनपुरा, ता. मेहगाव, जि. भिंड, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
एक पिस्तूल दीड हजार रुपयात माळेन येथून खरेदी केल्याचे कर्तारसिंगचे म्हणणे आहे. वाळूज एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलजवळ पांढर्‍या-पिवळ्या मोठय़ा रेषांचा शर्ट घातलेला एक जण पिस्तुलासह येणार असल्याची माहिती एका खबर्‍याने गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांना कळवली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी वाळूज एमआयडीसीमध्ये सापळा रचला. या वेळी खांद्यावर खाकी रंगाची रेक्झिनची बॅग घेऊन पायी जाणार्‍याला पोलिसांनी अडवले. त्याची अंगझडती घेत बॅग तपासण्यात आली. या वेळी बॅगमध्ये पाच गावठी पिस्तुले, 12 जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या आढळल्या. कर्तारसिंगवर मध्य प्रदेशात एका महिलेचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने हे पिस्तूल कोणाला विक्रीसाठी आणले होते, याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जमादार शेख आरेफ, गोकुळ वाघ, देविदास राठोड, दिलीप माळी, विजयसिंग जारवाल, प्रकाश काळे, नवनाथ परदेशी, नवाज पठाण, द्वारकादास भांगे यांचा पथकात समावेश होता.