आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआरसीचा नियम लाथाडून संग्रामनगर पुलाचे बांधकाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आहे त्या स्थितीत काम करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा अट्टहास संग्रामनगर पुलाच्या धोकादायक अवस्थेला जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या आदर्श बांधकाम नियमावलीनुसार पुलाच्या दोन्ही दिशांना उतार संपताच वळण नसावे, असे स्पष्ट नमूद केले असताना मुख्य चौकात रस्ता आणून जोडण्यासाठी हे आडवळण करण्यात आल्याचे दिसते ,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
28 जानेवारी रोजी संग्रामनगरच्या पुलाचे उद्घाटन झाले आणि आठवडाभरातच अक्षत जैन या विद्यार्थ्याचा या पुलावरील उतारावर अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या पुलाच्या सदोष रचनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने तज्ज्ञांशी चर्चा करून पूल आणि त्यातील त्रुटी याबाबत जाणून घेतले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. बी. एन. पाटील, प्रा. महंमद सादिक आणि र्शेयस अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. उमेश साळुंके यांनी या पुलाच्या डिझाइनपासून इतर तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला. त्यात अनेक नवे मुद्दे समोर आले असून संभाव्य धोक्यांची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
कशामुळे झाला हा प्रकार?
दर्गा चौकातील रस्त्याला हा पूल सरळ येत जोडला जात नाही. कारण दर्गा चौक ते बीड बायपास हा रस्ता तिरपा आहे. त्यामुळे पूल सरळ आला तर तो थेट चौकाला जोडला जात नाही. तो जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने सरळ जातो. पण चौकाला जोडण्यासाठी आणि सध्या कमानीशेजारी असणार्‍या पुलाचा वापर करण्यासाठी हे वळण करण्यात आले. आहे त्या जागेचा वापर करून चौकाला हा मार्ग जोडण्याच्या नादात केलेला भयंकर घोळ वाहनचालकांच्या जिववर उठणारा आहे. तज्ज्ञांच्या मते येथे अपघात होण्याचा धोका कायमच आहे.
पोलिस आयुक्तांनीही धोका वर्तवला होता
संग्रामनगर पुलाचा अँप्रोच अरुंद असल्याने अपघातांचे धोके वाढणार, असे पत्र मी काम सुरू असतानाच रस्ते विकास महामंडळाला दिले होते, असे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. दग्र्याच्या कमानीजवळील अपघात झाला म्हणून त्या बाजूच्या सदोष रचनेवर चर्चा होत आहे. प्रत्यक्षात दोन्ही बाजू धोकादायक आहेत. अलीकडील बाजूला वळणामुळे या पुलावरून उतरणार्‍या वाहनांना धोका जसा आहे तसा दुसर्‍या बाजूलादेखील आहे. पुलावरून वाहने वेगात येतात. त्यांना लगेच बीड बायपास लागतो.
पुलाची लांबी, रुंदी, उंची याचे गणित बांधून पुलाच्या दोन्ही टोकांची रचना केली जाते. पुलाचा प्रारंभ व शेवट होणारा भाग कधीच वळणाचा नसावा.
पूल संपतानाच वळण आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीनुसार पूल संपताना वळण असूच नये. वाहनांना वेग नियंत्रणात आणण्यासाठी सरळ रस्ता हवा.‘दिव्य मराठी’ने पूल बांधकाम विषयातील तज्ज्ञांची मते घेतली असता, त्यांनी पुलाची डावी बाजू (बाणाने दर्शवलेली) अशी सरळ असावी, असे स्पष्ट केले.
उड्डाणपूल बांधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यावरील वळण निश्चित केल्याचे राज्य रस्ते महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र, आयआरसीच्या नियमानुसार पुलाला कोणतेही वळण नको.