आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - विश्रांतीचा अभाव व वाढत्या कामाच्या ताणतणावामुळे दरवर्षी 9 हजार कर्मचारी मृत्युमुखी पडत असल्याची माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे सचिव एम. राघवय्या यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षी रेल्वेने 1 हजार 10 मिलियन टन माल रवाना केला असून भारतीय रेल्वे जगाच्या नकाशावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कर्मचा-यांच्या भवितव्याचा विचार रेल्वे करीत नसून जनावरे थांबत नाहीत अशा स्थानकावर कर्मचारी काम करतात. सहाव्या वेतन आयोगामध्ये नमूद केलेली श्रेणी व भत्ते अद्याप कर्मचा-यांना मिळाले नाहीत. त्यासाठी कर्मचारी ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा राघवय्या यांनी दिला.
काय आहेत मागण्या : रेल्वे चालक, गार्ड यांच्यासाठीच्या रनिंग रूम (विश्रांतीगृह) वातानुकूलित करण्यात याव्यात, कर्मचा-यांच्या निवासस्थानांची दूरवस्था दूर करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कर्मचा-यांसाठी वैद्यकीय सुविधा प्रदान कराव्यात, दीड लाखावर विविध पदांच्या कर्मचा-यांच्या रिक्त जागा भराव्यात, ग्रेडपेमध्ये बदल करावा, सहावा वेतन आयोग लागून सात वर्षे झाली, आता सातवा वेतन आयोग लागू करा, नोकर भरती प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांचा समावेश करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
संपामुळे मोठे नुकसान : रेल्वेत मागील 38 वर्षांत संप झाला नसून संपामुळे प्रतिदिन 2 कोटी 40 लाख नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. प्रतिदिन 2300 कोटींचे नुकसान होते.
असा होईल संप : संघटनेतर्फे बेमुदत संपाची नोटीस चार महिन्यांपूर्वीच देण्यात आली आहे. ऑगस्टपासून आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार असून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष बेमुदत संप सुरू केला जाईल. चार महिन्यांची मुदत सप्टेंबरअखेर संपणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.