आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Aapana Club, Divya Marathi

28 वर्षांपासून सुरू आहे संस्काराची पाठशाळा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदललेल्या जीवनशैलीमध्ये मूळ संस्कारांचाच विसर पडला आहे. त्यातच विभक्त कुटुंब पद्धती आणि सहजतेने संस्कार करत असलेल्या आजी-आजोबांचा अभाव यामुळे नवी पिढी शिक्षित होत आहे; पण त्यांच्यात सुसंस्कारांचा अभाव दिसतो. याचा विचार करूनच शहरातील तीन मान्यवरांनी एकत्र येऊन लहान मुलांवर संस्कार करणारा अपना क्लब स्थापन केला. या माध्यमातून ते गेल्या 27 वर्षांपासून मोफत संस्कार वर्ग घेत आहेत. संस्कारांमागचे विज्ञान समजावून सांगण्याबरोबरच निसर्गभ्रमण, व्याख्याने आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याचे काम हा क्लब सातत्याने करतो आहे.
पूर्वीपेक्षा भौतिक सुविधा वाढल्या तसे संथ गतीने चालणारे जीवनमान बदलले. गतीमुळे आजकालच्या मुलांना सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत, पण त्यांच्यात सुसंस्काराची मूल्येच रुजवली जात नाहीत. कारण पालकांना त्यासाठी वेळच नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच शहरातील नंदकिशोर कागलीवाल, डॉ. साधना शाह आणि डॉ. भगवानदास वर्मा यांनी 1985 मध्ये अपना क्लब नावाने संस्कार वर्गाची सुरुवात केली.
संस्कार वर्गातील पाठातून घडतात मुले
शालेय पाठय़पुस्तकातून ज्ञान मिळते; पण बरेचसे संस्कार हे घरातूनच होत असतात. ती कमी हा क्लब भरून काढतो. पाठय़पुस्तकातून मुले ज्ञानी होतील; परंतु संस्कारक्षम होतीलच असे नाही. याचाच विचार करून दर रविवारी अपना क्लबमध्ये वैज्ञानिक, समाजसुधारक, हुतात्म्यांचा परिचय, नैतिक शिक्षण, विविध कलांचा परिचय, हैदराबाद मुक्तिसंग्राम, जगातील विविध क्रांत्या, भारतीय संत, पर्यटन, पर्यावरण, राष्ट्रीय एकात्मता, प्रचार-प्रसार माध्यमे, भ्रष्टाचार व अंधर्शद्धा निर्मूलन तसेच स्वयंविकासाचे पैलू, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्यसंग्राम, बदलते जग व आम्ही, लेखन-वाचन, संवाद कौशल्ये, स्वच्छता, शिस्तपालन अशा जीवनातील सर्वांगीण विषयांवर भर दिला जातो. हिंदू संस्कृती जोपासत असताना वेद, उपनिषदे, सणवार, पुण्यतिथी यावर व्याख्याने आयोजित केली जातात. अशा विषयांना स्पर्श करून मुलांवर संस्कार करण्याचे काम तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण करण्येचा प्रयत्न अपना क्लब संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो. 1985 ला पहिला वर्ग- 28 एप्रिल 1985 ला शारदा मंदिर प्रशालेत अपना क्लब संस्कार वर्गाचा पहिला वर्ग भरला होता. येथे सतत 25 वर्षे हा वर्ग चालला. त्यानंतर किलबिल बालक मंदिर, गुजराती कन्या विद्यालय, जागृती प्राथमिक शाळा, आनंद विद्याधाम अशा विविध ठिकाणी संस्कारवर्ग उघडण्यात आले. शहरात नव्हे, तर महादेव माळीराम ट्रस्ट शाळा हिंगोली, सरस्वती भुवन प्राथमिक शाळा जालना, भारतीय बालविद्या मंदिर, परभणी आणि बाबासाहेब परांजपे अपंग विद्यालय, अंबाजोगाई या बाहेरगावच्या ठिकाणीही संस्कार वर्ग उघडले आहेत.
0अपना क्लबचा स्तुत्य उपक्रम
0मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची धडपड
0भावी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न
यांचे लाभले मार्गदर्शन
अपना क्लबमध्ये आतापर्यंत स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई र्शॉफ, प्रकाश मोहाडीकर, वि. वि. चिपळूणकर, प्राचार्य प्रतापराव बोराडे, महेश गौरी, लेखिका योगिनी जोगळेकर, डॉ. माधवराव चितळे, वर्षा ठाकूर, प्रा. विजय दिवाण, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. जीवन देसाई, प्रा. लीला शिंदे, हिंदी लेखक कमलेश्वर आदींचे मार्गदर्शन लाभले.