आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार रुग्णांच्या अंधारमय आयुष्यात सप्तरंगांची उधळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सामान्य माणसं दोन डोळ्यांनी आयुष्याचे विविध रंग अनुभवतात. मात्र, जन्मापासून ज्यांना हा आनंद मिळालाच नाही, त्यांच्या पाठीशी सह्याद्रीप्रमाणे उभ्या राहणाऱ्या अवलियाने एक, दोन नव्हे, तर तब्बल १५१२ रुग्णांच्या अंधारलेल्या आयुष्यात रंगांची उधळण केली आहे. त्यासाठी गत २२ वर्षांपासून झटणाऱ्या या अवलियाचे नाव आहे अनिल लुणिया. स्वत: ११० वेळा रक्तदान करणाऱ्या अनिल यांनी २५२ जणांचे नेत्रदान करवून घेत दीड हजार रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे.
खूप समाधान मिळते
आपल्या कार्याबद्दल ते सांगतात, वडील भारतमल लुणिया यांच्याकडून या कार्याची प्रेरणा मिळाली. नेत्रहीनांना भेटून त्यांचे आयुष्य मी समजावून घेतले. नेत्रदानाची शास्त्रशुद्ध माहिती घेतली. नेत्रदानातून मिळणारे दोन डोळे सहा जणांना दृष्टी देतात, हे समजले तेव्हापासून मी हे व्रत स्वीकारले आहे. आरएच निगेटिव्ह या रक्तगटाची माणसं खूप कमी आहेत. त्यामुळे गरजूंची हाक येताच रक्तदानासाठी मुंबईपर्यंत गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणतात, नेत्रदानाच्या चळवळीत शासकीय पातळीवर अडचणी आल्या. मृत्यूनंतर सहा तासांत डोळे काढणे, तर २४ तासांत दुसऱ्याला बसवणे अावश्यक आहे. मात्र, शासकीय यंत्रणेतील डॉक्टर सहकार्य करत नाहीत. मृत्यूची माहिती मिळाल्यावर वारंवार फोन करूनही डॉक्टर विविध कारणे देत येणे टाळतात. पण, जिद्द सोडली नाही. व्रतापासून मागे हटलो नाही. आता जालन्याचे गणपती नेत्रालय आणि दृष्टी नेत्रालयाकडून सहकार्य मिळते. डॉक्टर, रुग्णवाहिका तत्काळ येतात. या धडपडीतून सहा जणांचे चेहरे फुलताना पाहून खूप समाधान मिळते.

अनंत अडचणी
नेत्रदानाच्या कामात मला शासकीय उदासीनतेचा सामाना प्रामुख्याने करावा लागतो. औरंगाबादेतील मृतांचे डोळे काढण्यासाठी जालन्यातून गणपती नेत्रालयची टीम रात्री अपरात्री येते. पण शासकीय रुग्णालयातून कुणीही येण्यास तयार होत नाही. शिवाय डोळे काढल्यानंतर पुन्हा ती जागा व्यवस्थित करण्याचे कामही ते बजावत नाहीत. यामुळे प्रेताची हेळसांड होते. अशा वेळी अविरत प्रयत्नांतून मृताच्या ज्या नातलगांना अवयवदानासाठी तयार केले तेही नाराज होतात. त्यांची समजूत काढतानाच गरजूपर्यंत वेळेत मदत पोहोचेल याची काळजी घ्यावी लागते.
बॅगेत चपलांचे जोड
रोज सकाळी वाजता अनिल घराबाहेर पडतात. बॅगेत कायम नव्या चपलांचे जोड असतात. अनवाणी फिरणाऱ्यांना ते या चपला देतात. वारकऱ्यांचे पाय दाबण्याची सेवाही दिली आहे. बाबा आमटेंचे आनंदवन आणि प्रकाश आमटेंचे हेमलकसा इथे औषधींची सेवाही त्यांनी दिली आहे. सध्या सात संस्थांसाठी ते कार्य करत आहेत.
त्वचादानाकडे लक्ष
आपल्याकडे सासरच्या जाचातून जाळल्या जाणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. अशा घटनांनंतर त्यांचे आयुष्य बिकट होते. विद्रूपतेसह जगणेही असह्य होऊन जाते. त्यामुळेच अशा महिलांना मृत व्यक्तींची त्वचा प्रत्यारोपित केली तर त्यांना नवजीवन मिळू शकते. म्हणूनच नेत्रदान, देहदानासह त्यांनी त्वचादानावर लक्ष केंद्रित केले आहे.