आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार बेवारस मृतदेहांना खांदा आणि मुखाग्नी देणारी "आशा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मृतदेहाला पुरुषांनी खांदा द्यावा आणि मुलानेच मुखाग्नी द्यावा, अशी पूर्वापार परंपरा; पण औरंगाबादेतील एका जिद्दी महिलेने ती मोडीत काढली. ११ वर्षांत तीन हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून समाजसेवेचे नवे उदाहरण तिने समाजासमोर ठेवले. आशा मिलिंद म्हस्के असे या महिलेचे नाव असून, त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे. अर्भक बालिकांवर नराधमांकडून होणारे अत्याचार पाहून मन बधिर होते. काही मुले आणि मुली जिवंतही असतात. अशांसाठी बालकाश्रम उघडण्याचा मनोदय आशा यांनी बोलून दाखवला.
जेमतेम पाचवीपर्यंत शिकलेल्या आशा मूळ पैठणच्या. लग्नानंतर जयभीमनगरात स्थायिक झाल्या. काही तरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा असल्याने २००५ मध्ये त्यांनी पंचशील बचत गटाची स्थापना केली. मनपाचे तत्कालीन प्रकल्प संचालक दिवंगत विजय जावरे यांना भेटून काम मागितले. त्यांनी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यात काम करण्याविषयी त्यांनी विचारले. हे काम आपणाला जमेल का? महिलांनी अंत्यसंस्काराचे काम करणे योग्य की अयोग्य, असे एक ना अनेक प्रश्न मनात होते; पण धाडस करून आशा यांनी कामाला होकार दर्शवला. इतर सदस्यांच्या पाठिंब्याने काम सुरू केल्याचे आशा सांगतात.
तत्कालीन महापौर विजया रहाटकर महिला असून शहराचा कारभार व्यवस्थितरीत्या सांभाळू शकतात, तर आपण का नाही, असा आत्मविश्वास निर्माण झाल्याने काही अडचण आली नाही, असे आशा सांगतात.

दोघींना भोवळ आली, पण मागे हटले नाही
फुलंब्रीरस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळल्याचा मनपातून फोन आला. सर्व सदस्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. १५ दिवसांपासून कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. दोघींना तर भोवळ आली; पण मी डगमगता तोंडाला पदर बांधला आणि मृतदेह कपड्यात बांधून स्मशानभूमीत नेला.

बहिष्काराचा प्रयत्न, लग्नकार्यात डावलले
बचत गटाकडून होणारे हे काम आजही नातेवाईक, समाजातील इतर लोकांना आवडत नाही. काहींनी तर बहिष्कृत करण्याचा प्रयत्नही केला. लग्नकार्यात डावलण्यात आले. पती वगळता कुटुंबातील इतर सदस्यही टोचून बोलत असत, परंतु सगळा रोष पत्करूनही माझे काम सुरू आहे, असे आशा सांगतात.