आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते केले बंद: सोसायट्यांच्या गेटमुळे वाहनधारक त्रस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढल्याने कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गल्ली-बोळांमध्ये तरुण भरधाव वेगाने दुचाकी दामटत असल्याने तसेच वाहनांच्या गोंगाटापासून सुटका मिळवण्यासाठी विविध सोसायट्यांतील नागरिकांनी स्वत:हून कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेट बसवले आहेत. अंतर्गत रस्ते बंद झाल्याने वाहनचालकांना याचा फटका बसत आहे.

एखाद्या कॉलनीतील रस्ता बंद करण्यासाठी महापालिकेने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार संबंधित गृहनिर्माण संस्थेने बैठक घेऊन मनपाच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीचा अर्ज मनपा आयुक्तांकडे जातो. त्यानंतर वाहतूक पोलिसांतर्फे याचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच परवानगी मिळाली तर पादचार्‍यांचा विचार करून गेट बसवता येते. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये गेट बसवताना नियमांना डावलण्यात आले आहे.

अकस्मात रस्ताबंदी
वाहनधारकांचा त्रास वाढल्यामुळे व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकच पुढाकार घेऊन अंतर्गत रस्ते बंद करत असल्याचे चित्र आहे. उदाहरणार्थ चार दिवसांपूर्वी पैठण गेटहून निराला बाजारकडे जाणारा रस्ता वाहतूक शाखेने वन-वे घोषित केला. परिणामी सिल्लेखाना आणि पैठण गेटला जाणार्‍या सर्व वाहनधारकांनी जयहिंद कॉलनीतील पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ निर्णय घेऊन हा मार्गच बंद करून टाकला. या कारणाने निराला बाजार चौकात वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली.

रस्ताबंदीची कारणे अशी
>कॉलनीतील नागरिकांना एकांत व शांतता मिळावी
>सोसायटीत खेळणार्‍या लहान मुलांना भरधाव दुचाकीची धडक लागू नये म्हणून
>औरंगपुर्‍यासारख्या भागातील लोकांना वाहतुकीचा त्रास वाढला असल्याने
>अनेक जुने रस्ते अपुरे पडत असल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली

काय म्हणतो नियम ?
>बैठक घेऊन गृहनिर्माण संस्थेने नगररचना विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक
>परवानगीसाठी मनपा आयुक्तांकडे अर्ज करावा
>वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण केल्यानंतर गेट बसवण्याची परवानगी

नागरिक : वर्दळीमुळे निर्णय
>वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे गेट बसवणे गरजेचे आहे. किमान दुचाकी चालक व पादचार्‍यांचा विचार व्हावा.- किशोर निकम, रहिवासी

>जयहिंद कॉलनीतून किमान दुचाकी जाईल अशी व्यवस्था करावी. -राजकुमार सवाईवाले, रहिवासी

>वाहनधारकांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी गेट बसवण्याचा निर्णय घेतला. अरुंद रस्त्यांमुळे वर्दळ वाढली आहे. - समीर राजूरकर, नगरसेवक

>विद्यार्थी गल्लीत भरधाव वाहन चालवतात. खबरदारी म्हणून गेट बसवले. -मालती जैस्वाल, रहिवासी


अधिकारी : परवानगी आवश्यक
>सोसायटीला स्वतंत्र गेट बसवायचे असल्यास रितसर मनपाकडे निवेदन देणे आवश्यक आहे. परंतु, असे कुठलेही अर्ज येत नाहीत. सोयायटीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती सोसायटी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येते. त्यामुळे कुठलाही बदल करण्याअगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे.
-दीपक कुलकर्णी, नगररचना सहायक संचालक

>जयहिंद कॉलनीत गेट बसवल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. संबंधित पोलिस ठाण्याला कारवाईबाबत सूचना देण्यात येईल. शिवाय शहरातील इतर सोसायट्यांनी गेट बसवण्यासाठी मनपाकडून परवानगी घेतली आहे का ? याचीही पाहणी करण्यात येईल. तत्पूर्वी नागरिकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
-अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा