आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकुंभसाठी ५४०० विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘सूर्यकुंभ’या सोलर कुकिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ५४०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सीएमआयए, सिम्प्लिफाइड टेक्नॉलॉजीज फॉर लाइफ आणि एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या आणखी वाढेल, अशी माहिती एमआयटीचे संचालक मुनीश शर्मा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

एमआयटीच्या प्रांगणात सकाळी ८.३० वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्््घाटन करण्यात येईल. गेल्या महिनाभरापासून याविषयी शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या जिल्हा परिषद तसेच मनपा शाळेच्या मुलांसाठी सिडको बसस्थानकावरून सीएमआयएच्या वतीने बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या रंगानुसार टी शर्ट घातलेले ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी या वेळी उपस्थित राहतील.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांचे ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी-स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत पर्यावरणानुकूल आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सोलर कुकर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देतील. सोलर कुकर तयार करून त्यात अन्न शिजवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी आणि उपस्थितांना पाहता येईल. सर्व पदार्थ शिजवून झाले की विद्यार्थी आणि प्रशिक्षक त्याचा आस्वाद घेऊन सूर्यकुंभ साजरा करतील, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

प्रत्येक विद्यार्थी करणार दहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
याउपक्रमासाठी गेल्या महिनाभरापासून दररोज वेगवेगळ्या शाळांना भेटी देण्यात येत आहेत. या माध्यमातून ३६ शाळा, २५०० शिक्षक आणि १६ हजार विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान दहा विद्यार्थ्यांना सोलर कुकरची माहिती सांगितली तरी त्याच्या प्रचारास मदत होईल. त्यामुळे ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार होऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून विज्ञान शिकण्याची संधी मिळणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकीळ, मिलिंद कंक, व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी. शर्मा उपस्थित होते.