आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैरऊर्जेचा वापर: शेती हिरवीगार, खर्चातही बचत; अाष्टी तालुक्यातील केरूळ येथील युवा शेतकऱ्याने साधली किमया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडा- सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे अाष्टी तालुक्यातील केरूळ येथील युवा शेतकऱ्याने डिझेल पंपाच्या खर्चावर मात तर केली त्याशिवाय शेतीदेखील हिरवीगार केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अटल सौरऊर्जा योजनेमुळे हे शक्य झाले असून विजेवरील अवास्तव खर्च वाचणार अाहे.
    
युवा शेतकरी मुश्ताक असरुद्दीन शेख यांची केरूळ हद्दीच्या दरम्यान असलेल्या रस्त्यापासून आत काही अंतरावर शेती आहे. या शेतात कोणतेही पीक घेतले तर त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असे. कारण  एरवी शेतात विहीर असूनही  त्यातील पाणी पिकांना द्यायचे असले तरी डिझेल पंपाशिवाय पर्याय नसायचा. डिझेलचा खर्चही परवडणारा नव्हता, शिवाय जवळ डीपी नसल्याने वीज कनेक्शन सोयीचे नव्हते.
    
कृषी प्रदर्शनाचा लाभ   
मुश्ताक शेख एकदा नागपूर येथे कृषी प्रदर्शन पाहायला गेले असताना त्यांना जैन इरिगेशन जळगाव यांच्या स्टाॅलवर सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपाची माहिती समजली. मुश्ताक भाईंनी सौरऊर्जेवर चालणारा पंप आपल्या शेतात बसवण्याचे ठरवले. जैन इरिगेशनचे अधिकारी राहुल  यांच्या ते सतत संपर्कात असत. त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी महावितरणच्या कडा कार्यालयामार्फत अटल सौरऊर्जा योजनेअंतर्गत अर्ज केला. योजनेच्या नियमानुसार ५ टक्के वाट्याचे ३४ हजार ७०० रुपये भरले. त्यातून त्यांना ५ अश्वशक्तीची मोटार चालू शकेल, असे युनिट मंजूर झाले. या कामी महावितरणचे अधिकारी मदन देशपांडे, कैलास जगताप यांच्यासह जाधव,  प्रशांत  पोकळे, अमोल कर्डिले, शहाजी कर्डिले यांचे सहकार्य मिळाले.    
 
जागरणाची गरज नाही   
आता मुश्ताक  शेख यांच्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा ही पिके आहेत. त्या पिकांना पाणी देण्यासाठी सौरऊर्जा पंप उपयोगी ठरत आहे. या पंपासाठी डी सी पद्धतीने ऊर्जा तयार होते. दिवसभर जितके वेळ सूर्य आकाशात असेल तेवढे वेळ पंप जोरात सुरू असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री जागरण करत बसण्याची गरज  पडत नाही. भारनियमन आणि वीज बिल या दोहोंपासून सुटका झाली आहे. 
   
वाॅटर मीटर, माेबाइल कंट्राेल   
सोळा प्लेटचे तीन संच वीजनिर्मिती करतात आणि मोटार सुरू राहते. या प्लेट्स सूर्याच्या दिशेने फिरवता येईल, अशी सोयही केलेली आहे. पिकांना किती पाणी दिले याचे मीटर देखील आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सगळी यंत्रणा मोबाइलद्वारे नियंत्रित करता येईल, अशी ही सुविधा उपलब्ध आहे. शासनाच्या योजनेमुळे माझी शेती आता समृद्ध झाली आहे, असे अाष्टी तालुक्यातील केरूळ येथील युवा शेतकरी मुश्ताक शेख यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...