आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जा निर्मिती हेच असावे सरकारचे मिशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पारंपरिक वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा, जलसाठे सतत कमी होत चालले आहेत. दुसरीकडे नागरिकीकरण व उद्योगांचा विकास यामुळे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात वीजनिर्मितीच्या मर्यादा लक्षात घेऊन पारंपरिक ऊर्जानिर्मितीबरोबरच अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसुद्धा अनिवार्य झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकार व राज्यात सत्तेत येणाऱ्या सरकारने सौरऊर्जा निर्मितीवर विशेष भर द्यावा. त्यामुळे हवा तेवढा विजेचा वापर होऊन खर्च वाचेल. वीज गळती व चोरी प्रामुख्याने रोखा, अशी मते "दिव्य मराठी'ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात तज्ज्ञ आणि या क्षेत्राशी संबंिधत मान्यवरांनी व्यक्त केली.

आधी भ्रष्टाचार थांबवा
शंभर टक्के वीज उपलब्ध आहे, पण वितरण व्यवस्था खिळखिळी आहे. ८० टक्के विद्युत खांब खराब झाले आहेत. विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र, कंडक्टर आदी साहित्य निकृष्ट दर्जाचे आहेत. या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली भारत सरकारची दक्षता समिती बरखास्त करण्यात आली आहे. ४५ ते ५० टक्के भ्रष्टाचारामुळे लॉसेस वाढले आहेत. ज्या ठेकेदारांकडून काम केले जाते ते दर्जेदार होत नाहीत. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही. राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जीटीएलकडे ३०० कोटी रुपये थकीत आहेत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. सरकारने प्रथम भ्रष्टाचार बंद करावा. नाही तर पाच टक्क्यांपेक्षा जास्त खाणार नाही याची शपथ घ्यावी. सुप्रीम कोर्टाने अजय मेहतांच्या धोरणामुळे आठ हजार कोटींचा लॉस झालेल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना पॉवर हाऊससाठी अनुदान द्यावे. कर्जाची व्यवस्था करावी. ज्यांनी पैसे भरले त्यांना वीज दिलीच पाहिजे.
प्रशांत बंब,आमदार

सौरऊर्जेसाठी सबसिडी
ग्रामीण भागात सहा ते चौदा तासांपर्यंत भारनियमन केले जाते. यामुळे उत्पादनात मोठी घट होते. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. रात्री अपरात्री पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी सौरऊर्जा पर्याय होऊ शकतो. त्यासाठी सरकारने सबसिडीची सवलत द्यावी. जर्मनीमध्ये सौरऊर्जेचाच वापर होतो. सौरऊर्जा निर्मितीसाठी वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश असतो. त्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करून शेतकरी स्वावलंबी होऊ शकतात.
त्र्यंबक पाथ्रीकर,उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी.
चर्चेतील मुद्दे
पारंपरिक वीजनिर्मितीला अपारंपरिक ऊर्जानिर्मिती योग्य पर्याय
अपारंपरिक प्रकल्पांची संख्या वाढवावी.
शेतकऱ्यांना अनुदान व कर्जात सवलत मिळावी.
राजकीय हस्तक्षेप थांबवा.
वीज गळती व चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकसहभागाची गरज.
वीज गळती व चोरी होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.
महाविद्यालयांत वीज निर्मिती व बचतीसाठी संशोधन व्हावे.
अॉटोमॅटिक एनर्जीवर भर द्यावा.
संपूर्ण वीज वहन अॉटोमॅटिक करण्यात यावे.
चीनची उपकरणे, लाइट, ट्यूबवर बंदी घालावी.
वायरलेस वीजनिर्मितीसाठी संशोधन व्हावे.
वीज चोरांवर कारवाईसाठी पोलिस ठाणे वाढवावे.
सरकारने योजनांची अंमलबजावणी करावी.
समताेल राखण्यासाठी वीज निर्मिती वाढवावी.