आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर सांडणारे रक्त देशबांधवांसाठी केले दान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्ताअभावी आपल्या देशबांधवांचा जीव जाऊ शकतो हे लक्षात येताच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रक्त सांडणारे 270 सैनिक आज रक्तदान करून आले. या पेढीत रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी झळकल्या होत्या.

मिलिटरी रुग्णालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्टेशन कमांडर ब्रिगेडियर मनोजकुमार आणि पत्नी रेखा सिंह यांनी केले. घाटीमध्ये सातत्याने होणारा रक्तसाठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकतेच गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या 60 विद्यार्थ्यांनी पहिल्या रक्तदानाचा आनंद घाटीच्या रक्तपेढीसह व्यक्त करून सामाजिक ऋण चुकते केले. आता जवानांनीही या रक्त संकलनात योगदान दिले. यामध्ये ए आणि बी पॉझिटिव्ह गटाचे सर्वाधिक रक्तदाते आहेत.

घाटी रुग्णालयात वाढती रुग्णांची संख्या आणि कमी साठा यामध्ये गरजू आणि गरीब रुग्णांना रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. दरवर्षी 15 आॅगस्टला सैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिरामार्फत रक्तदान केले जाते. यंदा मात्र समाजाची गरज ओळखून जवानांनी एक महिना आधीच रक्तदान केले. सैनिकांच्या तुकडीचे आणखी रक्तदान 22 जूलै रोजी करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे रक्तदान होणार असून पहिला टप्पा आज झाला.

घाटीच्या वतीने डॉ. सुनील आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजन बिंदू, डॉ. प्रल्हादराव जठार, डॉ. ऋषिकेश चेवले, डॉ. प्रवीण मेश्राम, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, सुनीता बनकर, तंत्रज्ञ शैलेंद्र गौडिया, इम्रान अंबेकर, देवकुमार तायडे, संध्या मुगुटे यांच्यासह 20 कर्मचार्‍यांनी काम पाहिले. एकावेळी 14 जवानांचे रक्त संकलन करण्यात आले.