आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात एक तपानंतर म्हणजेच 12 वर्षांनंतर भाकरी उलटली आहे. मंडळाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांची अध्यक्षपदी, तर आमदार सतीश चव्हाण यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष विठ्ठलराव लहाने आणि सरचिटणीस मधुकरराव मुळे यांना पराभूत करण्यात आमदार चव्हाण यांना यश आले.
मंडळाचे संस्थापक सदस्य सुंदरराव सोळंके यांनी 12 वर्षांपूर्वी मुळे यांच्याकडे संस्थेचे नेतृत्व दिले होते. मात्र, त्यांच्यात बेबनाव झाला. सन 2013 ते 2018 या कार्यकाळासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना 18 जून रोजी काढण्यात आली होती. बुधवारी विशेष सर्वसाधरण सभेत निवडणूक घेण्यात आली. सुंदरराव सोळंके यांनीच पुन्हा मुळे यांच्या ताब्यातील संस्था काढून घेण्यासाठी आपले आमदार पुत्र प्रकाश सोळंके यांना हिरवा कंदील दिला. 179 सदस्यांच्या मंडळात निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ प्राप्त होत नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुळे यांनी 9 जुलैला रात्री निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याची जाहिरात प्रसिद्ध करून ‘आजचे मरण उद्यावर..!’ ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आमदार चव्हाण यांनीही उपाध्यक्ष शेख चाँद यांच्या स्वाक्षरीची जाहिरात प्रसिद्ध करून निवडणूक प्रक्रिया नियोजित वेळेतच होईल, असे जाहीर केले. त्यामुळे मंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आणि निवडणूक प्रक्रियेत रंगत निर्माण झाली. सोळंके यांना यशस्वी साथ देत आमदार चव्हाण यांनी अक्षरश: मुळे यांच्या हातातून ‘सत्ता’ खेचून घेतली. सहायक धर्मादाय आयुक्तांच्या वतीने ए. एच. सय्यद व ए. एस. मोटघरे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. दीपक पडवळे यांनी, तर शैलेंद्र गंगाखेडकर यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.