आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश, कुठे अपघात तर कुठे आत्महत्या, जिल्ह्यातील काही बातम्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना /बदनापूर - घरातील परिस्थिती हलाखीची असल्याने मुलीच्या लग्नाची जबाबदारी भविष्यात पूर्ण करता येणार नाही, या धास्तीने अनेकजण आपल्या मुलीचा बालविवाह करण्याचा निर्णय घेतात. बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील १४ वर्षीय मुलीचे लग्न करण्याचे सालगडी असलेल्या पालकांनी ठरवले होते. या प्रकाराची माहिती तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांना मिळताच त्यांनी मुलीच्या पालकांची भेट घेऊन बालविवाहाच्या दुष्परिणामांची माहिती दिली अन‌् हा बालविवाह थांबवला.
आलमगाव येथील मूळ रहिवासी असलेले कुटुंब बदनापूर तालुक्यातील बुटेगावच्या शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलीस बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षणसाठी ठेवण्यात आले. मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाची चिंता असलेल्या पालकांनी मुलीचे औरंगाबाद येथील गारखेडा परिसरातील मुलाबरोबर लग्न लावण्याचा निर्णय घेतला. या विवाहाचा सर्व खर्च मुलाकडून केला जाणार असल्याने मुलीच्या या विवाहास पालकांनी परवानगी दिली. दरम्यान मुलीचा विवाह लावून देण्यासाठी मुलीस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून घेऊन जाण्यासाठी पालक आले असता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी केजीबीव्हीच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधूून मुलीच्या पालकांना थांबवून ठेवण्याच्या सूचना केल्या. या वेळी तहसीलदारांबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.यू.खरात, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अॅड.पी.व्ही.गवारे यांनीही शाळेत जाऊत मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत बालविवाहाचे तोटे समजावून सांगितले. यानंतर पालकांनी अधिकाऱ्यांचे ऐकून बालविवाह लावून देणार नाही, असे लेखी हमीपत्र दिले. तसेच मुलाच्या कुटुंबीयांना विवाह करणार नसल्याची माहिती दिली. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी अधिकाऱ्यांनी कुटुंबाचे बालविवाह करण्याचे मनपरिवर्तन करून मुलीला शिकण्याची संधी दिली.