आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलाचे वारे: शिवसेनेचे तीनपैकी दोन शहरप्रमुख बदलणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापालिका निकालानंतर शिवसेनेत आता संघटनात्मक बदलांचे वारे वाहत असून निवडणुकीतील असमाधानकारक कामगिरीचे खापर फोडण्यासाठी काही पदाधिकारी लवकरच बदलण्यात येणार आहेत. यात तीनपैकी किमान दोन शहरप्रमुख बदलण्याचीची चाचपणी सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीत ४९ जागा लढवत फक्त २८ शिवसेनेने जिंकल्या. शिवसेनेच्या नेत्यांना किमान ३५ ते ४० जागांची अपेक्षा होती; पण अनेक बालेकिल्ले या निवडणुकीत ढासळले. गुलमंडीसारखा अस्मितेचा वाॅर्ड शिवसेनेने गमावला, शिवाय पदमपुऱ्यासारखा बालेकिल्ला गमावला. माजी महापौर कला ओझा यांना निवडून आणता आले नाही. गड समजल्या जाणाऱ्या नक्षत्रवाडी वाॅर्डात माजी महापौर अनिता घोडेले यांनाही पराभूत व्हावे लागले. सिडकोतही हक्काच्या जागा शिवसेनेने गमावल्या. हे अपयश पक्षाची घसरत चाललेली ताकद असल्याचे सेनेतील पक्षश्रेष्ठींचे मत बनले आहे. शिवसेनेची ही स्थिती का झाली याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अहवाल देण्यात आला असून त्यात बड्या पदाधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. येणाऱ्या काळात डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेने संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात जाहीर बोलण्यास कुणी तयार नसले तरी खासगीत मात्र स्थानिक नेते बदलाची शक्यता गृहीत धरूनच आहेत.
गुलमंडी भोवणार?
गुलमंडीचा पराभव शिवसेनेच्या, खासकरून खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्याचा फटका मध्यचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना बसू शकतो. थोरात हे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांचे समर्थक मानले जातात. गुलमंडीच्या पराभवात जैस्वालांचाही सहभाग आहे, असे खैरे गटाला वाटते. त्यामुळे थोरात यांना शहरप्रमुख पदावरून काढण्याबाबत खैरे आग्रही राहणार आहेत.
शहर प्रमुखांवर गदा
पश्चिमसाठी राजू वैद्य, मध्यसाठी बाळासाहेब थोरात, पूर्वसाठी संतोष जेजूरकर हे तीन शहरप्रमुख आहेत. यापैकी किमान दोन शहरप्रमुख बदलले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. संपूर्ण संघटनेचा विचार केला तर ऐनवेळी तिन्ही शहरप्रमुख बदलले जाऊ शकतील, असे आज वातावरण आहे.
स्थानिकांचा विरोध
वैद्य शहरप्रमुख बनण्यास पूर्वमधील कार्यकर्त्यांचा विरोध आहे. इतकी वर्षे पूर्वमध्ये शिवसेना सांभाळल्यावर केवळ वाॅर्ड बदलला म्हणून वैद्य यांना हे मानाचे पद देऊ नये. त्यांना शहरप्रमुखच व्हायचे होते तर त्यांनी उमेदवारी मिळाल्यावरच पश्चिमचे शहरप्रमुखपद सोडायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यात माजी महापौर कला ओझा पराभूत झाल्यानंतर तेथे वैद्य यांना शहरप्रमुख करण्यास खैरे मुळीच इच्छुक नाहीत.
वैद्य यांना पश्चिम नको
राजू वैद्य या वेळी औरंगाबाद पूर्वमध्ये मोडणाऱ्या विद्यानगरातून निवडून आले आहेत. आता त्यांचे कार्यक्षेत्र पूर्वेकडे सरकल्याने पश्चिमचा शहरप्रमुख बदलला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्य यांनीही तसे बोलून दाखवले आहे. तसेच आता त्यांना पूर्वचे शहरप्रमुखपद मिळवण्यात रस निर्माण झाला आहे.
पश्चिममध्ये शर्यत
पूर्व आणि मध्यमध्ये राजकारण शिजत असताना पश्चिममध्ये शर्यत सुरू झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून उल्कानगरीत उभे राहिलेले पराभूत झालेले सुशील खेडकर, निवडणुकीत संधीच मिळालेले विजय वाघचौरे यांची नावे शहरप्रमुखाच्या शर्यतीत येत आहेत. हे दोघेही आमदार संजय शिरसाट यांच्या जवळचे आहेत. या नियुक्तीत शिरसाट यांचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे.