औरंगाबाद- रात्रीची वेळ आहे. नाट्यगृह घरापासून खूपच लांब आहे. घरात बरेच जण असल्याने सगळ्यांना सोबत घेऊन नाटकाला जाता येत नाही. शिवाय रात्री उशिरा घरी परत येण्याची सोय नाही, अशा अनेक कारणांमुळे रसिकांना नाटकाचा प्रयोग पाहता येत नाही. त्यांच्यातील नाट्यप्रेमाचा अंकुरही हळूहळू कोमेजत जातो. त्यांचा टीव्हीवरील मालिकांकडे ओढा वाढतो. अशा साऱ्या रसिकांना टीव्हीकडून नाटकाकडे खेचण्यासाठी रंगाई सांस्कृतिक परिवाराने ‘नाटक आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या परिवाराचे कलावंत रसिकांच्या घरीच जाऊन मोफत नाटक सादर करत आहेत.
अस्सल लोककलावंत प्रा. डॉ. राजू सोनवणे गेल्या वीस वर्षांपासून मराठवाड्याच्या नाट्य चळवळीत आहेत. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसेही पटकावली. मुंबईतून येणाऱ्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही ते नेहमी पाहतात. अलीकडील काही वर्षांत नाटकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, असे त्यांना लक्षात येऊ लागले होते. त्याची कारणे त्यांनी शोधली. तेव्हा अनेकांना नाटक पाहण्यास आवडते. मुलांनी नाटक पाहावे, अशी पालकांचीही इच्छा असते, पण ते त्यांना उपरोक्त कारणांमुळे शक्य होत नाही, असे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ‘नाटक आपल्या घरी’ हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. दहा तरुण कलावंतांना सोबत घेऊन तालमी केल्या.
महिनाभरापूर्वी उपक्रमाची
प्रत्यक्ष सुरुवात झाली. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय औरंगाबादेतील १५ घरांमध्ये त्यांनी ‘समथिंग इज मिसिंग’ नाटकाचे प्रयोग मोफत सादर केले. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
असाझाला पहिला प्रयोग : २६मे रोजी इंग्रजी शाळा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांच्या घरी पहिलावाहिला प्रयोग सादर करण्यात आला. त्या वेळी १२ प्रेक्षक होते. केवळ एका सोफ्याच्या मदतीने दिवाणखान्यातच नेपथ्य उभारण्यात आले होते. ५० मिनिटे कालावधीचा प्रयोग झाल्यावर तायडे कुटुंबीय भारावून गेले होते.
कथा काय?
एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची व्यथा ‘समथिंग इज मिसिंग’मध्ये मांडण्यात आली. त्यात धर्म, अतिरेकी कारवायांवरही भाष्य करण्यात आले आहे. तीनपात्री नाटकाचे लेखक नगर येथील संदीप दंडवते असून प्रा. सोनवणे यांनी दिग्दर्शन केले आहे. फरहान काझींची प्रमुख भूमिका सोनवणेच करतात. प्रेरणा कीर्तिकर, अमर सोनवणे आहेत. लक्ष्मण चौधरी, रोशन ठाकूर, अरुण शर्मा, रमेश लांडगे, अंजली कऱ्हाळे, प्रीतम चव्हाण यांची मोलाची भूमिका आहे.
दर्जेदार सादरीकरण
- मी "समथिंग इज मिसिंग'चा प्रयोग माझ्या कार्यालयात आयोजित केला होता. प्रा. सोनवणे आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण दर्जेदार तर आहेच, शिवाय त्यांची नाट्यचळवळीविषयीची कळकळही मला महत्त्वाची वाटते.
विनय शाक्य, रा. समर्थनगर
रसिक तयार व्हावेत म्हणून हा उपक्रम
- औरंगाबादेत नाट्यरसिक तयार व्हावेत. त्यांनी नाट्यकलेचा आस्वाद घेण्यासाठी नाट्यगृहात यावे, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
प्रा. डॉ. राजू सोनवणे