आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Son And Mother Meet Through Police Commissioner In Aurangabad

आयुक्तांच्या शिष्टाईने माय-लेकांची भेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भावांमध्ये बेबनाव असल्याने एका भावाने दुस-याला अत्यवस्थ आईची भेट घेऊ दिली नाही. परंतु पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी मध्यस्थी केल्यामुळे 31 तासानंतर माय- लेकाची भेट शक्य झाली. आईला भेटू न देणारा भाऊ एटीएसचा पोलिस निरीक्षक असून दुसरा रेल्वे पोलिसात अधीक्षक पदावर आहे.
एटीएसचे राजकुमार सोनवणे, अधीक्षक सुनील सोनवणे आणि त्यांची बुलडाणा येथील डॉक्टर बहीण हे तिघे सख्खी भावंडे आहेत. त्यांची आई चित्रलेखा गणपतराव सोनवणे (78) या दीड वर्षांपासून राजकुमार यांच्याकडे वास्तव्यास आहेत. त्या गेल्या आठ दिवसांपासून आजारी होत्या. अत्यवस्थ झाल्याने त्यांना सुमनांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आई अत्यवस्थ असतानाही राजकुमार यांनी त्यांच्या भाऊ व बहिणीला याबाबत कल्पना दिली नाही. इतरांकडून याबाबत कळाल्यानंतर सुनील व त्यांची बहीण दोघेही तत्काळ औरंगाबादला आले. त्यांनी आल्यानंतर राजकुमार यांना फोन केला. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आईला रुग्णालयातून घरी हलविले. त्यामुळे सुनील आणि त्यांची बहीण आईच्या भेटीसाठी व्याकुळ झाले होते.
भाऊ राजकुमार प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्या दोघांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे धाव घेतली व मदतीची याचना केली. आयुक्तांनी राजकुमार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोबाइल बंद करून ठेवला होता. त्यानंतर आयुक्तांनी एका पोलिस उपनिरीक्षकाला सुनील
सोनवणे यांच्यासोबत राजकुमार यांच्या घरी पाठविले आणि 31 तासांच्या अथक प्रयत्नानंतर माय-लेकांची भेट झाली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक सुनील सोनवणे यांनी भाऊ राजकुमार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
* आमचे कौटुंबिक वाद आहेत. राजकुमार आईची भेट होऊ देत नव्हता. पोलिस आयुक्तांच्या मदतीने भेट झाली. आईची प्रकृती सुधारल्यानंतर तिला सोबत घेऊन जाऊ. - सुनील सोनवणे, पोलिस अधीक्षक, रेल्वे विभाग पुणे.
* राजकुमार सोनवणे हे गेल्या आठ दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांचे पिस्तूल जमा करून घेतले आहे. दोघा भावांमध्ये काही वाद सुरू आहेत. त्यांचे भाऊ मला भेटले होते. - नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक, एटीएस
* सुमनांजली रुग्णालयात आईला दाखल केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना घरी नेण्यात आले. आईच्या भेटीपासून मी कोणालाही वंचित ठेवले नाही. - राजकुमार सोनवणे, पोलिस निरीक्षक एटीएस.
* दोन भावांतील बेबनाव आहे. मात्र यात निरपराध मातेचे हाल होत आहेत. दोन्ही भावांनी समजूतदारपणा दाखविणे गरजेचे आहे. या प्रकरणात मला यामध्ये मध्यस्थी करावी लागली. आईने तक्रार दिली तरच कारवाई शक्य आहे. - संजयकुमार, पोलिस आयुक्त.