आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभागी ठरवून टाकून दिलेला पूत्रच करतो \'नॉर्वे\'तून सांभाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा (ता. वैजापूर) - जन्मताच त्याच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी पोटच्या या गोळ्याला अभागी ठरवून टाकून दिले. अनाथालयात काही काळ राहिल्यानंतर त्या बाळाला नॉर्वेतील एका कुटुंबाने दत्तक घेतले. वयाच्या विशीत त्याला आपल्या मूळ कुटूंबाची ओढ लागली अन् वृद्ध वडिलांसह पूर्ण कुटुंबाशी त्याने सातासमुद्रापार मायेचे बंध जोडले.. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण या छोट्याशा गावातील ही एक जीवनगाथा आहे.

पानगव्हाण येथील शेतकरी काशीनाथ घायवट यांच्या पत्नी सुलैयाबाई यांनी 1976 मध्ये तिसर्‍या अपत्याला जन्म दिला. मात्र, महिनाभरातच त्यांचे निधन झाले. एका महिन्याच्या तान्हुल्याला अभागी ठरवत काशीनाथरावांनी त्याला येवला तालुक्यातील अंगुलगावच्या मिशनरींच्या दवाखान्यात टाकून दिले. तेथील कर्मचार्‍यांनी हे बाळ नऊ महिने सांभाळले.

काही दिवसांनी नॉर्वेच्या ग्रीमीतांड भागातील यॉन एरीक ओल्सन व म्यारून ओल्सर या निपुत्रिक दांपत्याने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

अनाथ झाला प्रेमल..
नॉर्वेच्या दाम्पत्याने दत्तकपुत्रासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करून बाळाचे नाव ‘प्रेमल’ ठेवले आणि नॉर्वे देशात नेले. आता तो शाळेत जात होता. मात्र त्याच्या वर्णावरून त्याचे गोरे मित्र नेहमी चर्चा करायचे. प्रेमल मोठा होऊ लागला तसे त्यालाही स्वत:बाबत उत्कंठा वाटू लागली. आई-बाबा, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा वर्ण गोरा असताना मीच निमगोरा कसा, या प्रश्नाने तो अस्वस्थ होऊ लागला.

पालकांनी सांगितली कहाणी..
बरीच वर्षे उलटली. शेवटी त्याने नॉर्वेतील आपल्या माता-पित्याला वर्णाबद्दलचे रहस्य विचारलेच. हृदयावर दगड ठेवून ओल्सन दांपत्याने त्याला पूर्ण कहाणी सांगितली आणि प्रेमलला आपल्या देशाची आणि रक्ताच्या नात्याची ओढ लागली.

आपलीच ओळख पटवण्याची धडपड
भारतात आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे ठरवून प्रेमल 1995 मध्ये भारतात आला. येवला तालुक्यातील अंगुलगाव त्याने सर्वप्रथम गाठले. दवाखान्यातील कर्मचार्‍यांनी त्याला गावाचे नाव ‘पाणंगा’ असे सांगितले. सबंध देशात शोधाशोध करूनही या गावाबाबत काहीही माहिती न मिळाल्याने हताश होऊन तो नॉर्वेला परतला.

ओळख पटली
आपण भारतीय आहोत आणि तिथे नातेवाईक आहेत, ही जाणीव प्रेमलला स्वस्थ बसू देत नव्हती. 1997 मध्ये मिशनरींच्या कामासाठी जळगावला आल्यावर त्याने अंगुलगाव दवाखान्यातील कर्मचार्‍यांना गावाचा शोध घेण्याची विनंती केली. कागदपत्रांचे ढिगारे उपसल्यानंतर गावाचे व कुटुंबीयांचे नाव त्यांना सापडले.