आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांसाठी 'भागमभाग' हायअलर्ट, हेलिपॅड उभारले, रक्त गटासाठी डॉक्टरांची पळापळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची बुधवारी दिवसभर रंगीत तालीमसाठी एकच धावाधाव झाली. सोनियांचा रक्तगट मिळवून त्याचा साठा राखीव ठेवण्यासाठी डॉक्टरांचीही धावपळ उडाली, तर आमखास मैदानावर दिवसभर पोलिस आयुक्तांसह अख्खे पोलिस दल घाम गाळत असल्याचे चित्र दिसून आले.
सोनिया यांची गुरुवारी आमखास मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठोपाठ सोनियांच्या रूपाने दुसरी व्हीव्हीआयपी नेता आठ दिवसांत शहरात येत असल्याने पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. मोदींच्या सभेसाठी जी धावपळ गरवारे स्टेडियमवर झाली तशीच धावपळ मंगळवारी दिवसभर आमखास मैदानावर बघावयास मिळाली. सुरक्षेच्या कारणावरून दिलेला हायअलर्ट तपासण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह सलग तीन तास मैदानावरील रंगीत तालीम घेण्यात व्यस्त होते. सोनियांचे हेलिकॉप्टर थेट मैदानातच उतरणार असल्याने प्रचंड मोठ्या पोलिस फौजफाट्यासह आयुक्तांनी जणू आज त्या सभास्थळी दाखल झाल्या अशी खरीखुरी तालीम करून सुरक्षेची खातरजमा करून घेतली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या तालमीचा समारोप झाला. सोनियांच्या सभेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा पथक) तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. एसआरपी, शीघ्रकृती दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 3 पोलिस उपायुक्त, 8 सहायक पोलिस आयुक्त, 22 पोलिस निरीक्षक आणि सुमारे 500 पोलिस सभास्थळी राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिली.
रक्तपेढीला पत्र
घाटीच्या रक्तपेढीस तीन ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या बाटल्या सोनिया गांधींसाठी राखीव ठेवा, असे आदेश देणारे पत्र मिळाले. त्यामुळे ते जमवण्यासाठी डॉक्टरांची एकच धांदल उडाली. सायंकाळी साडेसहापर्यंत तीन रक्ताच्या बाटल्या जमवण्यात घाटीतील डॉक्टरांना यश आले. यातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातभार लावला हे विशेष.