आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्या सभेला उद्धवपेक्षा जास्त गर्दी जमवण्याचा प्रयत्न, प्रत्येक मतदारसंघातून 10 हजार नागरिक बोलावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची शहरात सभा होत आहे. मोदींसाठी गरवारे क्रीडा संकुल खच्चून भरले होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गर्दी झाली होती. मोदींच्या सभेसाठी झालेल्या गर्दीइतकी शक्य नसली तरी किमान उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त माणसे दिसतील, याची खबरदारी घेण्याचे श्रेष्ठांनी जिल्ह्यातील आमदारांना सांगितले आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजता सभा होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने आमखास मैदानाचा ताबा घेतला आहे. हेलिपॅडची तयारीही सायंकाळपर्यंत झाली होती. त्यामुळे सोनिया गांधी या सभेचे ठिकाण वगळता शहरात अन्यत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनीही दोन दिवस जिल्ह्यात फिरून गर्दी वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले. प्रत्येक मतदारसंघातून किमान दहा हजार लोक यावेत, अशा तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. सोनिया गांधी यांच्यासमवेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे येणार आहेत. दरम्यान, गर्दी जमवण्याची जबाबदारी कोणावरही देण्यात आलेली नाही. सोनियांच्या सभेसाठी आपणहून लोक येतात, असा दावा जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी केला आहे. शहरातून मोठ्या संख्येने नागरिक येतील, असा दावा शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी केला आहे.
सभास्थळी येणार, तेथूनच जाणार
सोनिया गांधी या हेलिकॉप्टरने शहरात येतील.आमखास मैदानाच्या मागील बाजूनेच हेलिपॅड तयार करण्यात येत आहे. त्या तेथे उतरतील, सभेला संबोधित केल्यानंतर पुन्हा त्याच मार्गे रवाना होतील.