आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनोग्राफी केंद्र बंदमुळे परवड, सोनोलॉजिस्ट असोसिएशनतर्फे महापालिकेवर माेर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑलइंडिया सोनोलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक बंदमुळे अनेक रुग्णांची फरपट झाली. तर पीसीपीएनडीटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी सुमारे अडचशे डॉक्टरांनी महापालिकेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.
पोटदुखी, किडनी स्टोन, बाळातील व्यंग, बाळाची अवस्था कशी आहे, त्याची हालचाल यासह विविध बारीक गोष्टींचे निदान आणि त्यानंतरच्या उपचारांची दिशा ठरवण्यात सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. शहरातील एका सेंटरवर दिवसाला किमान ३० ते ४० सोनोग्राफी केल्या जातात. यातील किमान १५ सोनोग्राफी गर्भवतींच्या असतात. सोनाेग्राफीद्वारे बाळाची एकूण तब्येत तपासणे सोपे होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी आलेल्या पीसीपीएनडीटी (प्री कॉन्सेपश्नल प्री नटल डायग्नोस्टिक टेक्निक) कायद्यामुळे डॉक्टरांवर जाचक अटी लादण्यात येऊन गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार आजवर शहरातील २३ डॉक्टरांवर कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत. या सर्व डॉक्टरांना एफ फॉर्ममधील तांत्रिक चुकांमुळे दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, हायकोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर महानगरपालिका आरोग्य विभागाने त्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. अशा गंभीर शिक्षेमुळे या कायद्यात बदल करणे गरजेचे असल्याची मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. या मागणीकडे लक्ष वेधणे आणि सोनोग्राफीचे महत्त्व लक्षात आणून देणे यासाठी हा बंद पुकारण्यात आला. यामुळे गर्भवतींसह विविध आजारांच्या रुग्णांना सोनोग्राफीअभावी परत फिरावे लागले. आगामी काळात हे आंदोलन तीव्र झाल्यास त्याच्या झळा रुग्णांना सोसाव्या लागणार आहेत.
डॉक्टरांचा महापालिकेवर मोर्चा : महात्मागांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात ३५० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. या वेळी कायद्यातील बदल आणि सूचना यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असोसिएशनचे समन्वयक डॉ. मनदीपसिंग लोधवाल, आयएमए अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, डॉ. गिरीश चिरलीकर, डॉ.पंडित पळसकर, डॉ. घनश्याम मगर, डॉ. नम्रता धानोरिया, डॉ. अशोक बगडिया, डॉ. लामी रचकोंडा, डॉ. अाशा साकोळकर, डॉ. प्रतिभा कुलकर्णी, डॉ. शमा खान, डॉ. अंजली वरे, डॉ. अनुराधा शेवाळे, डॉ. जयश्री मोरे, डॉ. महेश तांदळे, डॉ. सारंग चौबे, डॉ. आभा नेमीवंत, डॉ. मनीषा काकडे, डॉ. सविता पानट यांचा समावेश होता.

कायद्यात बदल हवा
शहरातआम्ही स्टिंग ऑपरेशन केले होते. हायरिस्क जिल्ह्यांत औरंगाबादचा समावेश असल्याने कायद्याची अंमलबजावणी अाणि मुलींची संख्या वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
डॉ.जयश्री कुलकर्णी, आरोग्यअधिकारी, मनपा
स्टिंग ऑपरेशन करावे
ऐनवेळी तातडीने सोनोग्राफी करावी लागते. १८ कॉलमच्या एफ फॉर्ममध्ये एखादी गोष्ट भरायची राहते किंवा चूक होते. याचा अर्थ आम्ही गुन्हेगार आहोत असा होत नाही.
डॉ.शरद कोंडेकर, रेडिओलॉजीविभाग , धूत रुग्णालय
महिलेलाही दोषी ठरवले जावे
गर्भलिंग चिकित्सेच्या प्रकरणात गर्भवती महिलेवरही कारवाई होईल, अशी तरतूद असावी. यामुळे समाजात वचक बसेल. डॉक्टरलाच दोषी धरणे योग्य नाही. विशेष म्हणजे फॉर्म भरणे हे कारकुनी काम आहे. डॉक्टरचे ते काम नाही. डॉक्टरांनी सोनोग्राफीकडे लक्ष द्यावे की फॉर्मकडे? डॉ.राजेंद्रसिंह परदेशी, स्त्रीरोगतज्ज्ञ,जिजाई रुग्णालय