आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वेष इतका विकोपाला गेला की,वडिलांकडूनच मुलाचे अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खंडणी, वादातून अपहरणाचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र, श्रावस्ती कॉलनी, भावसिंगपुरा येथे राहणार्‍या शेजार्‍यांमधील वादातून निर्माण झालेला द्वेष इतका विकोपाला गेला की, एका वडिलांनीच मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो उघडकीस आला. बनाव रचणार्‍या वडिलाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट पोलिस ठाण्यात आलो, असे रडत रडत सांगणारा मुलगा छावणी पोलिस ठाण्यात आला. तेव्हा तेथील कर्मचारीही चकित झाले. त्यांनी त्याला शांत केले. त्याच्या धाडसाचेही कौतुक केले. हे काही तरी मोठे अपहरणनाट्य आहे, असे वाटून त्यांनी इतर पोलिस ठाण्यांनाही अलर्ट केले. मग काही वेळानंतर त्याने एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल, अशी त्याची कहाणी सांगण्यास सुरुवात केली.

पोलिस खोब्रागडेंकडे पोहोचले : मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. अपहरणकर्ते फरार होऊ नयेत, म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंडे, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सहायक फौजदार शेख रहिम, जमादार सुदाम हारदे आधी खोब्रागडेंच्या घरी पोहोचले. तेव्हा त्या अतिशय निवांत होत्या. तेव्हाच मुंडेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, तरीही त्यांनी त्यांची कसून चौकशी केली. दिवसभर कुठे होता, असे वारंवार विचारले. त्यावर त्यांचे मी दिवसभर घरीच तर होते, असे उत्तर होते.

वडीलही रडू लागले : मग पोलिसांनी अपहरण झाल्याचे सांगणार्‍या मुलाकडे त्याच्या आई-वडिलांबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने वडील विलास अवचार यांचा मोबाइल क्रमांक दिला. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा मुलगा सापडल्याचे कळवले. मुलाला घेऊन जा, असे म्हणत ठाण्यात बोलावले. तेथे येताच अवचार ढसढसा रडू लागले. खोब्रागडे बाईने माझ्या मुलाचे अपहरण केले होते, असे तेही म्हणू लागल्याने पोलिस चक्रावून गेले. मात्र, आपण काहीच न विचारता किंवा मुलाशी संपर्क झालेला नसतानाही अवचार खोब्रागडेंनीच माझ्या मुलाचे अपहरण केल्याचे सांगत असल्याने पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. त्यांनी प्रकरणाचा तातडीने उलगडा करण्यासाठी अवचारला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा पाचच मिनिटांत त्याने आपणच मुलाच्या अपहरणाचे कुभांड रचल्याचे कबूल केले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे उलगडले नाट्य
कथानक रचले आणि...
मुलगा शाळेतून बाहेर आल्यावर त्याला अवचार यांनी सोबत घेतले. अ‍ॅपेरिक्षात बसवून पंढरपूर, वाळूज भागात फिरले. तोपर्यंत अवचार आणि त्यांच्या पत्नीने नातेवाइकांना फोन करून मुलाचे अपहरण झाल्याचे सांगितले. सायंकाळी सहाच्या सुमारास हे दोघे नगर नाक्याजवळ रिक्षातून उतरले. तेथून पायी येत अवचार यांनी मुलाला ठाण्यासमोर आणून सोडले होते. पोलिसांना काय सांगायचे, याचे कथानक रचून त्याची उजळणीही अवचार यांनी मुलाकडून करवून घेतली होती.

प्लॉटच्या वादामुळे रचला डाव
श्रावस्ती कॉलनीत राहणारे अवचार (वय 40) वाळूज येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली. ते दुसर्‍या कामाच्या शोधात होते. त्यांनी कॉलनीत 2008 मध्ये एक प्लॉट खरेदी केला. तो त्यांच्या शेजारी राहणार्‍या बेबीनंदा खोब्रागडे (वय 43) यांना खरेदी करायचा होता. त्यावरून त्यांच्यात आणि अवचारमध्ये नेहमी भांडण व्हायचे. त्याचे रूपांतर द्वेषात झाले आणि बेबीनंदा यांना गोवण्याचा प्रयत्न केला.

उंदीर मारण्याचे औषध असलेला चिवडा दिला
तो म्हणाला की, दुपारी शाळा सुटल्यानंतर एक वाजेच्या सुमारास एका रिक्षाचालकाने भावसिंगपुर्‍यात जात असल्याचे सांगून मला रिक्षात बसवले. मात्र, रिक्षा भावसिंगपुर्‍याकडे न नेता रिक्षाचालकाने मला पडेगाव येथे नेले. या वेळी त्याच्यासोबत बेबीनंदा राधेश्याम खोब्रागडे ही शेजारी राहणारी महिलादेखील होती. या दोघांनी मला चिवड्यामध्ये उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातले, परंतु मला संशय आल्याने एकच घास खाऊन तो मी थुंकलो. यानंतर लघुशंकेचा बहाणा करून त्यांच्या तावडीतून निसटलो आणि अपहरणकर्ते काय बोलत होते याचीही माहिती दिली.